Rahul Narvekar : विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar ) यांच्याकडून मराठी वाचताना अनेक चुका घडल्याचं दिसून आलं. सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचा शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकरांकडून चूक घडल्याचे दिसून आलं होतं. यावरुन विरोधकांकडून सातत्याने टीका होत असल्याने अखेर मराठी वाचतानाच्या चुकांवरुन हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली चूक मान्य करीत दिलगिरी व्यक्त केलीयं. शोकप्रस्तावासंदर्भातील प्रिंट बारीक फॉन्टमध्ये आणि थोडी अस्पष्ट दिसत असल्याने माझ्याकडून वाचताना चूक घडली, कोणाचेही मन दुखावले असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करीत असल्याचं म्हणत राहुल नार्वेकरांनी माफी मागितलीयं.
पुढे बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना माझ्याकडून चूक घडली. शोकप्रस्ताव एकूण 12 होते. माझ्यात हातात आलेली शोकप्रस्तावाची प्रिंट बारीक फॉन्टमध्ये आणि अस्पष्ट होती. वाचन करीत असताना माझ्याकडून जसेच्या तसे वाचण्यात आलं. ही चूक माझ्याकडून वाचन करताना घडली. मागील चार वर्षांपासून मी सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अनेक भाषणे मी मराठीत केलेली आहेत, शोकप्रस्तावही मांडलेले आहेत. मराठीबद्दल सर्वांनाच अभिमान आहे, तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलंय.
तसेच दिवंगत आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही राज्यातील कोणती व्यक्ती करु शकत नाही. विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करु शकत नाही. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलं त्याचा वेगळा अर्थ काढू नये. भाषणावेळी सभागृहातील कोणत्याही व्यक्तीचे सदस्याचे मन दुखले असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असल्याचाही उच्चार राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
राहुल नार्वेकर यांनी नेमकं काय वाचलं होतं?
राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्तावावर आपले मनोगत व्यक्त करताना एकूण 26 चुका केल्या होत्या. मराठीच्या ललाटी वैभव आहे. या वाक्यात ललाटी शब्द का वापरला आहे ते हे माहीत नाही. आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर असताना नार्वेकर यांनी ते नाव दीनदयाळ असे वाचले. ही अतिशय गंभीर चूक मानली जात आहे. संगीताच्या या ऐवजी संगीताचा असा शब्द प्रयोग हवा होता. उडत्या गाण्यातील खट्याळपणा ऐवजी उडत्या चालीच्या गाण्यातील खट्याळपणा असा शब्दप्रयोग हवा होता. दिलेली योगदान ऐवजी दिलेले योगदान असं म्हणायला हवे होते.चुकीचे शब्द सहा वापरण्यात आलेले आहेत. रसिकांच्या ऐवजी रेसिकांच्या हा शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे. अलौकिक त्या ऐवजी अवलोकिक असे ते म्हणाले होते.
