Tanpure Cooperative Sugar Factory : राहुरीमधील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या (Tanpure Cooperative Sugar Factory) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने एकतर्फी विजय मिळविला. जनसेवा मंडळाचे सर्व 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर या निवडणुकीत विरोधी शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
या निवडणुकीत विखे – कर्डिलेंची तटस्थ भूमिका राहिली होती. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमृत धुमाळ, प्रदेश सदस्य अजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल उभे ठाकले होते. तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) आणि राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे (Arun Tanpure) यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने ही निवडणूक लढवली. मात्र सुरुवातीपासूनच मतदारांचा कल जनसेवा पॅनलकडे झुकलेला दिसून आला व शेवटी या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय झाला.
शेटे यांचा पराभव…विखेंनी लोकसभेचा हिशोब चुकता केल्याची चर्चा
या निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांच्या विरोधातील राजू शेटे यांच्या पॅनेलचा पराभव झाला, मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) हिशोब चुकता केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. त्याला पार्श्वभूमी म्हणणे शेटे यांनी लोकसभेत विखे यांच्या विरोधात उमेदवार असणारे निलेश लंके यांचा प्रचार केला होता. मात्र जनसेवाच्या मतदारांना विखेंची छुपी मदत होती व यामधून शेटे यांचा पॅनलचा पराभव झाला अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर सुजय विखे यांनी लोकसभेच्या पराभवाचा बदला घेतल्याची देखील गुप्त चर्चा रंगली होती.
तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी तटस्थ भूमिका निभावली. मतदानापूर्वी सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्या असे आवाहन सभासद शेतकऱ्यांना केले होते. तसेच विजयी पॅनलला सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची मदत राहील असेही व्हिडिओद्वारे विखे म्हणाले होते. यामुळे शेवटच्या टप्प्यात विखेंचा तो संदेश व जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय व शेटे यांचा पराभव यामागे विखेंची छुपी यंत्रणा कार्यरत होती असेही बोलले जात आहे.
शेटे यांचा पॅनल कर्डिलेंवर विसंबून होता
लोकसभा निवडणुकीमध्ये शेटे यांनी सुजय विखे यांचे प्रतिस्पर्धी निलेश लंके यांचा प्रचार केला होता. मात्र विधानसभेच्या वेळी त्यांनी शिवाजीराव कर्डिलेंचे प्रचार काम केले. कारखाना निवडणुकीत कर्दिलेंकडून मदत होईल असे समीकरण आखण्यात आले होते अशी चर्चा आहे मात्र मतदानापूर्वी एकदिवस आधी विखे यांनी एका व्हिडीओ संदेशद्वारे आपला व कर्डिले यांचा कोणाला पाठिंबा व कोणाला विरोध नाही असे म्हंटले व शेटे यांच्या पॅनलला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे तनपुरे गटातील काही उमेदवारांना विखेंची मदतही मिळाल्याची चर्चा झाली.
तनपुरे कोणती गुड न्यूज देणार?
तनपुरे कारखान्याची निवडणूक झाल्यावर आठवडाभरात तालुक्याला गोड बातमी मिळेल, असे अरुण तनपुरे यांनी म्हटले आहे. हाच मुद्दा घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, मी तुतारीचा निष्ठावंत आहे. सहकार खाते घड्याळाकडे आहे. येत्या आठवडाभरात तालुक्याला सुखद धक्का मिळेल, कारखाना चालू करण्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाला धक्का; ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
तनपुरेंची पुढील राजकीय इनिंग कशी असणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलं आहे. यामुळे तानपुरे काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. तर प्राजक्त यांचे मामा जयंत पाटील यांचे देखील गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांशी वाढत्या भेटीगाठी यामागे वेगळे राजकीय समीकरण जुळून येणार की काय अशी चर्चा सुरू आहे.