Raj Thackeray On Eknath Shinde : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी पालक आंदोलन करत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात आता राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आहे आणि या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
तसेच तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.
आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.
Badlapur School : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहेर इंग्लिश स्कूलचा शहरातून मुकमोर्चा
माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.