बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश; म्हणाले, आरोपीला…
Raj Thackeray On Badlapur Case : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणात विरोधक राज्य सरकारवर टीका करत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी करत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी गेल्या 6 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करत आहे तर आता या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसैनिकांना आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी एका ट्विटमध्ये या घटनेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले ? असा प्रश्न विचारला आहे.
आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले की, बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या. असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024
नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये (Badlapur Case) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
‘येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा…’, अंधारेंचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.