पुढच्या पिढीला हिरवागार महाराष्ट्र देणार की काँक्रीटचं जंगल? पर्यावरण दिनी राज ठाकरेंचा थेट सवाल

केवळ झाडं लावण्याच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन पर्यावरणाकडे पाहण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.

Untitled Design 37

Untitled Design 37

Raj Thackeray’s Environment Day post is in the news : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण, हवामान बदल आणि विकासाच्या मॉडेलवर भाष्य करणारी सविस्तर फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. केवळ झाडं लावण्याच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन पर्यावरणाकडे पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी, वाढतं तापमान आणि त्याचे अर्थव्यवथा, शेती व नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण धोरणांवर टीका करत नागरिकांना देखील आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. पर्यावरण दिन म्हणजे केवळ झाडं लावून फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा उत्सव बनला असल्याचं सांगत, अशा मोहिमांमधील बहुतांश झाडं टिकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी सरकारने कोट्यवधी झाडं लावल्याचा दावा केला होता, मात्र ती झाडं नेमकी कुठे आहेत, असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

 

राज ठाकरे यांनी हवामान बदलाचे गंभीर परिणाम अधोरेखित करत काही महत्वाचे आकडे देखील मांडले. यंदाच्या उष्णतेमुळे देशाच्या उत्पादकतेचं जवळपास 159 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. तर अतिउष्णतेमुळे दरवर्षी सुमारे 160 अब्ज कामाच्या तासांचं नुकसान होत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. पर्यावरणीय बदलांमुळे भारताच्या जीडीपीमध्ये 2.5 ते 4.5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा जागतिक बँकेचा अंदाज असल्याचं सांगत, देशातील 57 टक्के जिल्हे हवामान बदलामुळे गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

गुटखा, भेसळ आणि बनावट औषधांबाबत तक्रार करायची? FDA ने जाहीर केला टोल-फ्री नंबर

विकासाच्या नावाखाली केवळ रस्ते, पूल आणि मोठ्या प्रकल्पांचं श्रेय घेण्यापेक्षा शहरं आणि गावं अधिक राहण्यायोग्य कशी होतील याचा गंभीर विचार होणं गरजेचं असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. एका पावसात शहरांची दाणादाण उडते, ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते आणि उन्हाळ्यात अनेक भागांत करणं देखील कठीण होतं, असं त्यांनी नमूद केलं.

केंद्र सरकारवर निशाणा साधताना गेल्या अकरा वर्षांत खाणी, रस्ते आणि आता प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलजमीन हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे 1 लाख 73 हजार हेक्टर जंगलजमीन नष्ट झाल्याचा दावा करत, हे क्षेत्रफळ मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या तब्बल 16 पट असल्याचं त्यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं.

पावसाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम? केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाचे संकेत

सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या तरुणांना देखील त्यांनी संदेश दिला. जगातील हिरवीगार, नियोजनबद्ध शहरं पाहून प्रभावित होणाऱ्या तरुणांनी अशाच शहरांची मागणी महाराष्ट्रात देखील करावी, खोट्या आकडेवारीला आणि दिखाऊ विकासाला भुलू नये, असं आवाहन त्यांनी केलं. आपण निसर्गपूजक समाज होती, पण नकळत निसर्गविनाशक बनलो आहोत, असं म्हणत कोकणातील देवरायांचं उदाहरण त्यांनी दिलं. पर्यावरण हा आता केवळ निसर्गप्रेमींचा विषय राहिलेला नसून अर्थव्यवस्था, आरोग्य, शेती आणि शहरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न बनल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

आपल्या पुढच्या पिढीला आपण कसा महाराष्ट्र देणार आहोत? झाडांविना शहरं, गटारं बनलेल्या नद्या आणि असह्य उष्णतेची गावं की हिरवीगार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी पर्यावरणाबाबत गंभीर विचार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यातूनच जागतिक पर्यावरण दिनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version