गुटखा, भेसळ आणि बनावट औषधांबाबत तक्रार करायची? FDA ने जाहीर केला टोल-फ्री नंबर

आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांचा वेग वाढला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 35

Tukaram Mundhe In Action Mode : राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली असून अवघ्या सहा दिवसांत राज्यभरात 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत 102 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 68 दुकाने आणि हॉटेल्सवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांचा वेग वाढला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा कडक इशारा देत त्यांनी पुढील काळात आणखी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नागरिकांना थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. अन्नातील भेसळ, औषधांमधील गैरप्रकार तसेच गुटखा आणि पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीबाबत नागरिक आता थेट प्रशासनाशी संपर्क साधू शकतात. यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक आणि jc-foodhq@gov.in हा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे.

सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर, तर वैभव सूर्यवंशीचे पदार्पण; भारतीय टी-20 संघात बदलांचे वारे

दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत 4 मे रोजी धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 18 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजस्थानमधील चालक सुरेश कुमार गोवरिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही काळात अन्न व औषध प्रशासन विभाग लाचखोरी आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासकीय बदल करत तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार त्यांनी 25 मे रोजी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर लगेचच राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात व्यापक मोहीम सुरू करण्यात आली. आरोग्याला घातक ठरणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायावर लगाम घालण्यासाठी प्रशासनाची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून नागरिकांनीही अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us