रावणाला एक लाख मुलं? मध्ये जेवला-बिवला की नाही? राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी

रावणाचे पुत्र आणि नातवंडांची संख्या तसेच ‘अस्त्रालय’ या शब्दापासून ‘ऑस्ट्रेलिया’ कथेबाबत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले.

Untitled Design   2026 09 06T142723.810

Untitled Design 2026 09 06T142723.810

Raj Thackeray’s witty barbs : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचवेळी एका मुनीने सांगितलेल्या रामायणातील रावणाच्या कथेचा उल्लेख करत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. रावणाचे पुत्र आणि नातवंडांची संख्या तसेच ‘अस्त्रालय’ या शब्दापासून ‘ऑस्ट्रेलिया’ हे नाव पडल्याच्या कथेबाबत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राज ठाकरे म्हणाले, तो एक कोणीतरी कुरळ्या केसांचा आहे ना, केस वाढवलेला… थोडा असा आहे… काहीही सांगत असतो आणि लोक समोर भाबडेपणाने बसलेले असतात. जे तोंडाला येईल ते बोलत असतात. त्या दिवशी त्यांनी अशीच एक गोष्ट सांगितली. राम आणि रावणाचे जेव्हा युद्ध झाले, तेव्हा त्या युद्धात रावणाचे एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू मारले गेले, असं ते म्हणाले. मला जेवढी माहिती आहे, त्यानुसार रावणाला फक्त दहा तोंडं होती. एक लाख मुलं? मध्ये जेवला-बिवला की नाही? काहीही स्टोरी सांगतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; “फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर”

पुढे आणखी एका कथेचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, काय तर म्हणे युद्ध झाल्यानंतर तिथे सगळी अस्त्रं पडली होती. रामाने ती पाहिल्यानंतर म्हटलं की, ही अस्त्रं कोणाच्याही हाती लागता कामा नयेत. त्यांनी हनुमानाला सांगितलं की, दहा हजार किलोमीटर दूर जाऊन ही सगळी अस्त्रं ठेवून ये. हनुमानाने ती सगळी अस्त्रं तिथे ठेवली आणि परत आला. जिथे ही अस्त्रं ठेवली, ते ‘अस्त्रालय’ झालं आणि त्याचं नंतर नामकरण ‘ऑस्ट्रेलिया’ झालं. ही माझी स्टोरी नाही, त्याची स्टोरी आहे. आता अस्त्रालयाचं जर ऑस्ट्रेलिया झालं असेल, तर हॉलंडचं, न्यूझीलंडचं, इंग्लंडचं काय झालं असेल? काय करायचं? हे सगळं समोर सुरू असताना लोक मन लावून ऐकत असतात.

हे काय चाललं आहे? देश कुठे चालला आहे? आपण कुठे चाललो आहोत? मूळ समस्या काय आहेत? देशातील परिस्थिती काय आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. यावेळी राज ठाकरे यांनी देशातील धार्मिक वातावरण आणि सोशल मीडियाबाबतही भाष्य केले. सरकारी कार्यालये, शाळा, न्यायालये आणि सरकारी आस्थापनांमध्ये नियम आणि शिस्त पाळली गेली पाहिजे, असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे आवाहन केले. मला काही धोके दिसत आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो जाणीवपूर्वक केला जात आहे आणि पुढेही केला जाणार आहे.

पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?

त्यासाठीच या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. देशात सर्वत्र धर्माची झिंग आली आहे. धर्माचा अभिमान असणं समजू शकतो; पण धर्माची झिंग नको. आपण धर्माभिमानी असलं पाहिजे, धर्मांध नव्हे. असं वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टी लोकांपर्यंत पाठवल्या जात आहेत आणि त्यातून राग निर्माण केला जात आहे, जेणेकरून देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं,” असेही राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version