Download App

Ram Shinde : रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील पाठलाग संपेना..

Ram Shinde vs Rohit Pawar : आमदार राम शिंदे (Ram Shinde)आणि आमदार रोहित पवार (Rohit) यांच्यात अलीकडे टोकाची राजकीय स्पर्धा वाढली आहे. कामांचे श्रेय घेण्यावरून कार्यकर्ते फोडण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात. अलीकडे एका व्यासपीठावर येणेही ते टाळतात. इतकेच नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही टाळले जाऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोघांतील राजकीय पाठलाग संपत नसल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर विधीमंडळ प्रतिनिधी म्हणून नियुक्ती होताच त्या पाठोपाठ राम शिंदे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University) अधिसभेवर नियुक्ती झाली आहे.

कर्जत विधानसभा निवडणुकीत रोहित पवार विजयी झाल्यानंतर राम शिंदे हे माजी आमदार झाले होते. पण त्यानंतर काही कालावधीतच ते विधानपरिषदेत आमदार म्हणून पोहोचले. महाविकास आघाडी सरकार असताना राम शिंदे यांचे अनेक कार्यकर्ते रोहित पवार यांच्याकडे गेले. त्यातील काही कार्यकर्ते पुन्हा शिंदे यांच्याकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचीही रस्सीखेच सुरू झाली आहे.

हेही वाचा : भाजप आमदार Ram Shinde यांच्याकडून Balsaheb Thorat यांना पक्षप्रवेशाची ऑफर

कर्जत-जामखेड मतदारसंघात सरकारी योजना कोणी आणल्या याच्या श्रेयातूनही या दोन नेत्यांमध्ये पाठलाग सुरू असतो. रोहित पवार हे बारामतीतून कर्जतमध्ये येऊन आपले राजकीय बस्तान बसवतात आता याचे उत्तर म्हणून शिंदे हे बारामतीत जाऊन पवारांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे या दोघांतील राजकीय संघर्ष वाढत चालला आहे.

याआधी जानेवारी महिन्यात आ.पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी आ. शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘महाराष्ट्राच्या क्रिकेटला मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत खेळाडू या क्षेत्रात होऊन गेले. सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांची परंपरा आहे. मात्र, क्रिकेटशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीची केवळ कोणा बड्या नेत्याचा नातेवाईक म्हणून थेट निवड होणे हे धक्कादायक आणि क्रिकेटसाठी नुकसानकारक आहे.’ असे शिंदे म्हणाले होते.

त्यानंतर आता शिंदे यांनीही आघाडी घेतल्याचे दिसत आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. ही निवड म्हणजे आ. पवार यांना दिलेले एक उत्तर म्हणून पाहिले जात आहे, तशी चर्चाही सुरू आहे. या दोघांतील राजकीय पाठलाग सुरूच आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत हा पाठलाग असाच सुरू राहणार असल्याचे दिसते.

Tags

follow us