read out the complaints in front of Sunetra Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल (ता. 22 मे) पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजप विरोधात तक्रारीचा पाढा वाचला. भाजप निधी वाटपासोबतच कशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गळचेपी करतो यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्याची सूत्राची माहिती आहे. काल पुण्यातील बारामती होस्टेल या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी विविध विषयावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि महापालिकेतील नगरसेवकांनी भाजप विरोधात तक्रारी मांडत भाजपवर संताप व्यक्त केला.
महापालिका निधीवाटप असो किंवा इतर गोष्टी संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच या बैठकीत स्थानिक स्वराज्याचा उमेदवाराची चाचपणी देखील करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महानगरपालिकेमध्ये महायुतीतील सर्वच नगरसेवकांना समान निधी वाटप मिळावा असं पत्र लिहिलं होतं. त्यानंतरही आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय यावर घेण्यात आलेला नाही. या पत्रासंदर्भात महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनीही भाजप आपल्यावर अन्याय करतोय समसमान निधी वाटप झालं पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
मेलोडी चॉकलेटप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
शिवाय राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना अंदाजपत्रकात कुठलाही निधी न देता त्यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न भाजपकडून झाला होता. शिवाय भाजपचे नगरसेवक महापालिकेत मनमानी कारभार करतात त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला आणि भाजपच्या नगरसेवकांना आवरा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले होते. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा उमेदवार कुठला आणि कोण असावा यावर देखील पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज पाहायला मिळाली मात्र यावर थेट भाष्य सुनेत्रा पवार यांनी केलेले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्थानिक स्वराज्य चा आमदार राष्ट्रवादीचाच असावा यासाठी पुणे जिल्ह्यात आमचं संख्याबळ आणि ताकद जास्त असल्याचे आधीच सूतोवाच दिला आहे. मात्र, बैठक झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, आज पक्षाच्या विविध विषयावर बैठका घेण्यात आल्या, बऱ्याच दिवसातून पदाधिकाऱ्यांशी बोलले नव्हते मात्र सगळ्यांशी भेटून चर्चा केली. इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली मात्र बैठकीमध्ये विविध विषयावरून पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुढील काळामध्ये नगरसेवकांचा निधी असो स्थानिक स्वराज्यचा उमेदवार किंवा राज्यसभा खासदारकीचा उमेदवार यावर सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
