मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर आज विधानसभेत रणकंदन झाले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन हक्कभंग समितीची निवड केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल कुल ऑपरेशन संजय राऊत पार पडणार आहेत.
विधानसभेच्या हक्कभंग समितीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या दोन दिवसात उत्तर द्यावे लागेल. संजय राऊत हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनीदेखील कारवाईला सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनीदेखील संजय राऊत यांचं विधान योग्य नसल्याचं म्हटले होते. सत्ताधारी पक्षाने घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता, विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती नेमली आहे.
राऊतांच्या ‘त्या’ विधानाशी अजित पवारही असहमत; म्हणाले, ‘हा विधिमंडळाचा अपमान…’
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या हक्कभंग समितीत 15 सदस्यांचा समावेश आहे. आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जयस्वाल हे आमदार या समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीत ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समावेश नाही.
जर संजय राऊत यांनी हक्कभंग केल्याचे सिद्ध झाले तर त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते किंवा त्यांना समज देऊन सोडून देखील दिले जाऊ शकते.