Khed Politics : बाबाजी काळे, अख्ख्या राज्यात एकहाती सत्ता मिळवणारा ठाकरेंचा वाघ
बाबाजी काळे हे ठाकरे सेनेचे खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार असून, खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी त्यांनी चांगलाच जोर लावला होता.
Khed ZP Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयामागे भावनिक लाट जरी असली तरी, खेडमध्ये मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटली असून, खेड तालुक्याच्या राजकारणात आज एकच नाव घुमतंय आणि ते म्हणजे आमदार बाबाजी काळे यांचं. या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची एकही मोठी सभाही झाली नव्हती. दिग्गज नेतेदेखील प्रचारासाठी फिरकलेही नव्हते. त्यानंतरही ठाकरेंच्या वाघानं पक्षाला हे घवघवीत यश मिळवून दिले आहे.
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल सोमवारी जाहीर झाले यात भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, चर्चा होतीये ती खेड पंचायत समितीच्या निकालाची. कारण या पंचायत समितीवर टाकरे गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. एकहाती सत्ता मिळवलेल्या खेड पंचायत समितीत ठाकरेंचा पठ्ठ्या म्हणून परिचित असलेले बाबाजी काळेंनी ही सत्ता खेचून आणली आहे.
खेड तालुक्यात सत्ता परिवर्तनाची लाट गेल्या काही काळापासून कायम राहिली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय बदलाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना उबाठाचे आमदार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले.
खेड जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत ठरली होती. पण, आता समोर आलेल्या निकालानंतर मात्र तालुक्यातील सत्ता-समीकरण आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खेड पंचायत समितीत एकूण 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यापैकी तब्बल 12 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे. या निकालामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल स्पष्टपणे समोर आला आहे.
दिलीप मोहिते पाटलांना आत्मपरिषणाची गरज
एकीकडे निकालांनतर खेडमध्ये बाबाजी काळेंचं नेतृत्व अधिक भक्कम झाल्याची चर्चेला सुरूवात झालेली असताना दुसरीकडे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा मानला जात असून, जुनी समीकरणं, मर्यादित संपर्क, आक्रमक मुद्द्यांचा अभाव ही या पराभवाची मुख्य कारणं असल्याचे सांगितलं जातयं. त्याशिवाय जिल्हा परिषदेसाठी निर्मला पानसरे यांच्यासारखे विजय मिळवून देणारे उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले. यापाठीमागे भविष्यात विधानसभा आणि लोकसभेला दिलीप मोहिते पाटलांना आव्हान उभे ठाकू नये यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याचा फटका जिल्हा परिषदेला बसल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे या निवडणुकीत आमदार बाबाजी काळेंनी स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी, सातत्याने गावागावात संपर्क विकासकामांवर आधारित प्रचार याचा थेट फायदा निकालात दिसून आल्याचे बोलले जात आहे.
बाबाजी काळे हे ठाकरे सेनेचे खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार असून, खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी त्यांनी चांगलाच जोर लावला होता. काहीही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यानंतर आता समोर आलेल्या निकालांनंतर खेड तालुक्यातील या निवडणुकांच्या निकालांनी राजकीय सत्ता-समीकरण पूर्णतः आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकली आहेत. खेड जिल्हा परिषदेचा निकाल हा केवळ स्थानिक निवडणुकीचा निकाल नसून तो आगामी राजकीय लढतीची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचं बोललं जात आहे.
