NEET परीक्षेतील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधातील आंदोलन हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर सामान्य घरातील विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा होता. या आंदोलनाला नंतर विविध विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला, मात्र सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट हेच या विजयाचं खरं कारण असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
अभिजीत दिपके यांनी आंदोलन सातत्याने सुरू ठेवले आणि त्यांना देशभरातून वाढता पाठिंबा मिळत गेला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्जनंतर संपूर्ण देशातील नागरिक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले. या एकीचेच फलित म्हणजे आंदोलनाला मिळालेले यश असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आंदोलनाच्या संपूर्ण काळात आपण अभिजीत दिपके यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो, असेही त्यांनी नमूद केले.
आंदोलनाला सुरुवातीपासून राजकीय रंग मिळू नये म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांनी जाणीवपूर्वक व्यासपीठापासून अंतर ठेवले, असे सांगताना पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बळावर लढा उभा केल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक व्यापक झाला आणि सत्ताधाऱ्यांच्या अहंकारालाही धक्का बसला.
भाजपच्या ट्रोल यंत्रणेकडून आंदोलनाची बदनामी करण्याचे प्रयत्न झाले, मात्र विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर ते निष्फळ ठरले, असेही त्यांनी म्हटले. एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला, हे या आंदोलनाचे मोठे यश असून विद्यार्थ्यांनी सत्तेच्या अहंकाराला धक्का दिल्याचे त्यांनी सांगितले. ईडीसारख्या यंत्रणांचा दबाव असूनही अन्यायाविरोधातील लढा थांबवणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि मजूर यांच्यावर अन्याय झाल्यास भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन रोहित पवार यांनी केले. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र उभे राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात कोणतीही कृती झाली, तर नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून आवाज उठवावा, असे आवाहन करत आगामी निवडणुकांमध्ये मतदान करताना सुजाणपणे निर्णय घ्यावा, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
