Rohit Pawar : रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून आज वाद झाला आहे. प्रशिक्षण केंद्रात जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केला. यावेळी रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पोलिसांचे संरक्षक भेदून प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर चढत केंद्राचे उद्घाटन केले. तसेच यावेळी रोहित पवार यांनी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) आमदार राम शिंदेंच्या (Ram Shinde) विरोधात घोषणाबाजी केली.
माहितीनुसार, राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच अडवलं तसेच चार चाकी वाहने, लोखंडी बॅरॅकेट्स आणि लाकडाच्या सहाय्याने रस्ता बंद केला. त्यानंतर रोहित पवार यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केला.
कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रोहित पवार यांच्याकडून करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. तसेच रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी रोहित पवार यांच्यासह ठिय्या आंदोलन सुरू केले.
काय म्हणाले रोहित पवार?
या प्रकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, SRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं असताना त्याविरोधात एक ब्र शब्द काढण्याचीही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची मंत्री असूनही हिंमत झाली नाही पण महाविकास सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा हे केंद्र कुसडगाव इथं मंजूर केल्याने ते आज सुरु झाला आहे.
त्याच देशमुख साहेबांना आणि ज्यांनी 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जतचा ST डेपो मंजूर केला त्या अनिल परब साहेबांना या केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी ‘एसआरपीएफ’ केंद्राच्या वाटेत चक्क काटे, बॅरिकेट्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचे काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करत आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी होणार घोषणा, जयंत पाटलांनी दिले संकेत
असा आरोप देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला. तसेच स्वाभिमानी कर्जत-जामखेडकर त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.