Rohit Pawar’s contact with intelligence agency in Delhi : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खाजगी गुप्तहेर संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्लीतील एका नामांकित तपास संस्थेशी प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर केंद्र सरकारने अधिकृत यंत्रणा म्हणून एअरक्राफ्ट अक्सिडेंट इन्व्हिस्टिगेशन ब्युरो अर्थातच AAIB मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा, केवळ शासकीय चौकशीवर अवलंबून न राहता स्वतंत्र आणि समांतर तपास व्हावा, यासाठी रोहित पवार आग्रही आहेत. सत्य बाहेर येणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून घातपात असू शकतो, अशी गंभीर शंका व्यक्त केली आहे.
रोहित पवारांचा दावा आहे की, या दुर्घटनेमागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी पायलटच्या भूमिकेवर तसेच संबंधित विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमानाच्या देखभाल नोंदी, उड्डाणापूर्वीची तपासणी, हवामानाची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींची सखोल छाननी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द
विशेष म्हणजे, बारामती येथे झालेल्या या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यासाठी रोहित पवारांनी युरोपियन विमान सुरक्षा संस्थेकडूनही तपास व्हावा, अशी मागणी केली होती. यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय परिमाण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी योग्य दिशेने सुरू असून ती पूर्णपणे तांत्रिक आणि निष्पक्ष असेल. या प्रकरणाचे राजकारण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री, नागरी उड्डाण मंत्री तसेच DGCA यांना ई-मेलद्वारे आपले सर्व मुद्दे आणि शंका कळवल्या आहेत. अपघाताच्या आधी आणि नंतरच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती देत त्यांनी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे काही घातपात किंवा मोठे षड्यंत्र आहे, याबाबत स्पष्टता येण्यासाठी अधिकृत AAIB अहवालासोबतच खाजगी तपास संस्थेच्या निष्कर्षांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
खाजगी संस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राज्याच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. सत्य काय, याचा उलगडा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
