MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! तक्रारदाराच्या ‘यू-टर्न’नंतर रोहित पवार तुकाराम मुंढेंच्या भेटीला
MPSC औषध निरीक्षक भरती प्रकरणी तक्रारदाराने युटर्न घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतलीयं.
MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथिक पेपरफुटी प्रकरण चांगलंच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या प्रकरणात मूळ तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केल्यानंतर आता थेट अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukarama Mundhe) यांची भेट घेतली. या भेटीत मूळ तक्रारदारावर दबाव आणून त्याच्याकडून हे लिहून घेण्यात आला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. पवारांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडालीयं.
मुंढेंच्या भेटीनंतर आमदार पवार म्हणाले, MPSC ही एक स्वायत्त संस्था आहे, हे आम्ही समजतो. मात्र, आम्ही दिलेले तक्रार अर्ज आणि पुरावे तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयामार्फत आयोगाकडे पाठवले जातील. २१ जुलै रोजी लोकेश पाटील आणि ऋषिकेश गांगर्डे या तरुणांनी तक्रार अर्ज दिला होता. मुंढे यांच्या कार्यालयाने तातडीने ते पुरावे आयोगाकडे वर्ग करून योग्य कारवाईची विनंती केली होती.
तुकाराम मुंढे यांचीही हीच स्पष्ट भूमिका आहे की, सनदी किंवा शासकीय अधिकारी पारदर्शक परीक्षेच्या माध्यमातूनच सेवेत आले पाहिजेत. जर कोणी पैसे देऊन किंवा ओळखीने पदावर बसत असेल, तर असा अधिकारी सर्वसामान्य जनतेला कधीच न्याय देऊ शकत नाही, असं आमदार पवार यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, दबाव आणून आणि धमकावून विद्यार्थ्यांकडून हे पत्र लिहून घेतले गेले आहे. परंतु सत्य कधीही लपत नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना अनेक चुका झाल्या असून संशयित अधिकच उघडे पडले आहेत. महाराष्ट्रातील तरुण हुशार आहेत, कितीही दाबाव आणला तरी सत्य समोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
MPSC सूत्रांच्या’ हवाल्याने व्हायरल होणाऱ्या पत्रावरून रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ५ थेट प्रश्न उपस्थित करत आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
-स्क्रीनशॉट खरेच आहेत: आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलो, असा दावा पत्रात आहे. याचा अर्थ व्हॉट्सॲपवर आलेले स्क्रीनशॉट खरे आहेत! पण FDA किंवा आयोगाकडे कोणी चेष्टेने तक्रार करतो का?
-मग तपास कशासाठी केला?: जर तक्रार चेष्टेत केली होती, तर मग आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास का केला?
-ती टेस्ट सिरीज कोणती?: व्हॉट्सॲपवर आलेली प्रश्नपत्रिका एका टेस्ट सिरीजची होती आणि त्यातील ९० प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आले, असा दावा केला जात आहे. मग ही ९० प्रश्न मॅच होणारी गुपितातली ‘टेस्ट सिरीज’ नेमकी कोणाची?
-तारखांचा घोळ काय?: परीक्षा २२ मार्च रोजी झाल्यानंतर, ती प्रश्नपत्रिका टाईप करून २० मार्चची तारीख दाखवून कशी पाठवली जाऊ शकते?
-नाव आणि स्वाक्षरीत फरक कसा?: तक्रारदाराचे आधीचे नाव व सही आणि आता व्हायरल झालेल्या पत्रातील नाव व सही वेगळी कशी?