Rohit Pawar’s warning on VSR’s functioning : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज तिसऱ्यांदा सविस्तर प्रेझेंटेशन देत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तपस यंत्रणांच्या कामकाजावर थेट टीका करत तपासाच्या गतीवर गंभीर आक्षेप नोंदवला. तपास यंत्रणा काम करत नाहीत, असा आरोप नसला तरी त्यांच्या कामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतरच तपासाला गती मिळाल्याचे सांगत त्यांनी डीजीसीएची पथके खासगी विमानाने बारामतीत दाखल झाल्याचा उल्लेख केला. आता विविध नेतेही या प्रकरणावर भूमिका मांडू लागले आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचे सांगत लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांना लवकरात लवकर उत्तर मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या अपघाताकडे पाहताना तो केवळ अपघात आहे की घातपात, हा मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे रोहित पवार म्हणाले. घातपाताच्या दिशेने तपासाचा प्रवास सुरू झाल्याची काही चिन्हे दिसत असल्याचा दावा करत त्यांनी 27 तारखेला कोण भेटायला आले होते, कोणाचे फोन आले होते आणि सायंकाळी 6.50 ते 7.05 या दरम्यान झालेल्या फोन संभाषणाची नोंद यांसारखे मुद्दे पुढे केले. या संदर्भात सध्या मर्यादित माहितीच देत असल्याचे सांगत त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहनही केले.
अपघातावेळी विमानात नेमकं काय झालं होतं?, अजित पवारांच्या विमान अपघातातील फ्लाईट डेटा रिकव्हर
या प्रकरणात संबंधित असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या कामकाजावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानाच्या देखभाल प्रक्रियेत आणि विशेषतः पायलटच्या ब्रेथ अॅनालायझर चाचण्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला. पायलटची बीए टेस्ट नियमितपणे घेतली जात नव्हती, अनेक वेळा उड्डाणापूर्वी चाचणी होत नव्हती, तर काही प्रकरणांत केवळ उड्डाणानंतरच चाचणी केल्याची नोंद आहे, असा दावा त्यांनी केला. काही चाचण्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न झाल्याचे, तर मशीनमध्ये छेडछाड करून तारखा बदलल्याचेही आरोप त्यांनी मांडले.
2023 मधील एका अपघात प्रकरणात सुनील कंजर आणि सुमित कुमार यांची बीए टेस्ट दोन वेळा पॉझिटिव्ह आल्याची नोंद असल्याचे सांगत त्यांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांनाच मशीनमध्ये फुंकण्यास सांगितले जात असल्याचे प्रकार समोर आल्याचा उल्लेख करत त्यांनी संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली.
परदेशी पायलट कॅप्टन कार्लोस याच्याबाबतही रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला. व्हेनेझुएलाचा हा पायलट परवाना संपुष्टात आलेला असतानाही त्याला प्रवासी म्हणून विमानात बसवले जात होते आणि नंतर त्याच्याकडून पायलट म्हणून विमान उडवून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उदयपूरमधील एका उद्योजकाचे विमानही हाच कार्लोस चालवत असल्याचे सांगत संबंधितांनी व्हीएसआर कंपनीपासून सावध राहावे, असा इशारा त्यांनी दिला.
या सर्व आरोपांमुळे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील संशय अधिक गडद झाला असून तपास यंत्रणा पुढे काय भूमिका घेतात आणि या आरोपांची पडताळणी कशी करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
