अपघातावेळी विमानात नेमकं काय झालं होतं?, अजित पवारांच्या विमान अपघातातील फ्लाईट डेटा रिकव्हर

अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आल्याची अधिकृत माहिती संस्थेने दिली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 58

Flight data recovery from Ajit Pawar’s plane crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणाची तपासणी एएआयबी कडून सुरू असून, अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आल्याची अधिकृत माहिती संस्थेने दिली आहे. बारामती येथे 28 जानेवारी रोजी लिअरजेट 45 (व्हीटी-एसएसके) या खासगी विमानाचा अपघात झाला होता.

या घटनेनंतर एएआयबीने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मानके आणि शिफारस केलेल्या कार्यपद्धतीनुसार सखोल चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत आणि अधिकृत तपास प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. मात्र अपघाताच्या वेळी तीव्र आगीमुळे दोन्ही उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीही डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती एएआयबीच्या प्रयोगशाळेत यशस्वीरित्या प्राप्त करण्यात आली आहे. या डेटामुळे अपघातापूर्वीच्या उड्डाणातील तांत्रिक बाबींचा तपशील समोर येण्यास मदत होणार आहे.

मोठी बातमी : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट

दरम्यान, हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची (सीव्हीआर) सखोल तपासणी सुरू आहे. उपकरणाचे गंभीर नुकसान झाल्याने त्यातील डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी अमेरिकेकडे विशेष तांत्रिक सहाय्य मागविण्यात आले आहे. संबंधित कंपनीच्या सहकार्याने या उपकरणातील ध्वनिमुद्रण पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ही चौकशी समावेशक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जात असल्याचे एएआयबीने स्पष्ट केले आहे. तसेच तपास प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि योग्य वेळी पुढील माहिती जाहीर केली जाईल, असेही संस्थेने नमूद केले आहे.

दरम्यान, या अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. एकीकडे एएआयबीची तांत्रिक चौकशी सुरू असताना, सीबीआय चौकशीच्या मागणीमुळे या प्रकरणाला नव्या राजकीय वळणाची चिन्हे दिसू लागली आहेत.

follow us