वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी; डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली.
Commendable initiative by Dr. D. Y. Patil College of Pharmacy : देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या जगतगुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. वारीदरम्यान दीर्घ पायी प्रवास, अधूनमधून होणारा पाऊस, मुक्कामस्थळी बदलणारे पाणी आणि हवामानातील बदल यांमुळे वारकऱ्यांना जुलाब, उलटी, अंगदुखी, सर्दी, ताप आदी किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आवश्यक ओटीसी औषधांचे मोफत वाटप करून त्यांचा योग्य वापर, खबरदारी व आरोग्यविषयक समुपदेशन केले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धीरज सुराणा, युगल ओसवाल व प्रतीक चुत्तर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमासाठी आवश्यक ती ओटीसी औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कुशल फार्मासिस्ट होण्याबरोबरच संवेदनशील व आदर्श नागरिक बनावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी केले.
बारामतीत दोन पोलिसांविरुद्ध महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा; भरतीत मदतीचे आमिष दाखवून केले अत्याचार
या उपक्रमासाठी प्रा. मुकेश मोहिते, प्रा. पवनकुमार वानखडे, प्रा. शुभांगी दसवडकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व सोनवणे, कृष्णा म्हसे, वेदांग जाधव, शार्दुल ढमाले आणि सानिका सांगवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील विश्वस्त तेजस पाटील तसेच संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.), यांनी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.