सीजेपी आंदोलनात शेकडो कार्यकर्ते ताब्यात, आता सरकारसमोर नवी अट; पत्रकार परिषदेत मोठा निर्णय

दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 10T195338.263

CJP Protest Abhijeet Dipke : दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनाविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र झाली असून, अभिजीत दिपके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप (CJP) सीजेपीकडून करण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कारवाईवर जोरदार टीका केली. मुख्य नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असला, तरी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अजिंक्य शिंदे यांनी दावा केला की, सीजेपीच्या तीन प्रमुख नेत्यांना विमानातून ताब्यात घेण्यात आलं असून, नेहा बोरा यांच्यासह इतर नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीला येणार्‍या आंदोलकांना विविध ठिकाणी रोखण्यात आलं, तर ट्रेन आणि बसमधून प्रवास करणार्‍या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यंदाच्या आंदोलनाला अडथळे निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगत, मागील आंदोलनात जंतर-मंतरवर एकत्र येऊन सरकारला धक्का दिला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सरकारच्या या कारवाईमुळे आंदोलक घाबरणार नाहीत, उलट सरकारच आंदोलनाला घाबरल्याचं दिसत असल्याचा दावा शिंदे यांनी केला.

सर्व बाजूंनी चाल करुन येतोय! विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा

अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर आलेल्या दुःखाच्या प्रसंगाचाही पोलिसांकडून विचार केला जात नसल्याचा आरोप अजिंक्य शिंदे यांनी केला. दिपके यांच्या आजीचं निधन झाल्यानंतरही त्यांना वकील आणि कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. विमानातून ताब्यात घेण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत, संबंधित नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचं शिंदे म्हणाले. अभिजीत दिपके यांच्यावर मानसिक दबाव आणला जात असून, त्यांच्याबाबतीत भावनिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळेपर्यंत सीजेपीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अजिंक्य शिंदे यांनी स्पष्ट केलं. ही केवळ एक दिवसाची लढाई नसून, गरज पडल्यास चार ते पाच दिवस किंवा त्यापेक्षाही अधिक काळ आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर केल्यास सरकार अडचणीत येईल, त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा करत, सरकारच्या दडपशाहीसमोर झुकणार नसल्याचा निर्धार सीजेपीच्या वतीने त्यांनी व्यक्त केला.

follow us