Valmik Karad Will Surrender ? : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. (Valmik Karad) या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान, पुणे येथील सीआयडी मुख्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. वाल्मिक कराड समर्थकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड कधीही सरेंडर होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
वाल्मिक कराड, CID चौकशी अन् फडणवीसांचे शब्द; जितेंद्र आव्हाडांनी घेतलं फैलावर
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
कार्यालयाबाहेर हालचालींना वेग
पुणे येथील सीआयडीच्या मुख्य कार्यालयाबाहेर हालचालींना वेग येऊ लागला आहे. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडांविरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा कराड समर्थकांनी केला आहे.
समर्थकांनी काय म्हटले?
कार्यकर्त्यांनी सांगितले की, वाल्मिक कराडविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांविरोधात हा राजकीय कट आहे. शरद पवारांचे धनंजय मुंडेंविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप मुंडे-कराड समर्थकांनी केला. धनंजय मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न पवारांचा आहे. त्यामुळेच त्यांना संपवण्यासाठी मुंडे यांचे जवळचे सहकारी कराड यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.
आम्ही आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांना भेटून कराड यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाले असल्याचे सांगणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. वाल्मिक कराड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा सिद्ध झाला नाही. आरोप कोणी कोणावरही करू शकतो. वाल्मिक कराडांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने तपास सुरू आहे असंही मुंडे-कराड समर्थकांनी सांगितले.