Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. सध्या येथील परिस्थिती शांततापूर्ण असली तर राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे.
आता खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे. राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; पोलिसांच्या गाड्या जाळल्या
गृहमंत्री फडणवीस वैफल्यग्रस्त
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवरुन त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, की गृह मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. गृहमंत्री फडणवीस वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. यामागे काय कारणे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. मात्र, ही कारणे सांगता येण्यासारखी नाहीत हे ही तितकेच खरे आहेत. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा आहे आणि यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
दरम्यान, आता शहरातील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, ही घटना रात्री 12.30 वाजता घडली. काही मुलांनी ही घटना घडवली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
गेल्या 35 दिवसांत सगळ्या मर्यादा पार झाल्यात; आव्हाडांनी थेट सुनावले
या प्रकरणाबाबत खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले, अमली पदार्थांच्या व्यसनींनी दहशत निर्माण केली आहे. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले. वरिष्ठ अधिकारी नव्हते. त्याचा तपशील तपासला पाहिजे. ही घटना निषेधार्ह आहे. मी शांत राहण्याचे आवाहन करतो. दंगलखोरांवर कारवाई केली जाईल. पोलीस आपले काम करत आहेत.