‘मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?’ संजय राऊतांच्या वक्तव्याने ‘बोध कीर्तन’ची चर्चा

तुरुंगातील अनुभव, राजकीय घडामोडी आणि साहित्यिक मित्रांसोबतच्या आठवणींमधून संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन.

News Photo   2026 10 31T193018.855

Sanjay Raut Bodh Kirtan

शिवसेना खासदार संजय राऊत (Raut) यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत यांनी प्रत्येक पुस्तकाचा स्वतंत्र उत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रात खाद्यपदार्थ आणि कपड्यांचे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात, मात्र मराठी साहित्याच्या निमित्तानेही राजधानी मुंबईत लोकांनी एकत्र यावे, पुस्तकांवर चर्चा करावी आणि साहित्यिक संवाद घडावा, यासाठी अशा कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या नावावरून संजय राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात, असा प्रश्न काहींना पडू शकतो, असे म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. दररोज रात्री 10 वाजता आपण कीर्तन करत असतो, असेही त्यांनी नमूद केले. उत्तम वक्ता हा उत्तम कीर्तनकार असला पाहिजे, असे सांगताना केवळ बोलण्याची शैली पुरेशी नसते, तर वक्त्याकडे सांगण्यासारखा आशयही असावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याच्या विचारांत आणि मांडणीत दम असतो, अशा कीर्तनकाराला श्रोत्यांची मोठी साथ मिळते, असेही राऊत म्हणाले.

तुरुंगातील 105 दिवसांच्या वास्तव्यात काम नसल्यामुळे लेखनासाठी वेळ मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवले पाहिजे, म्हणजे चांगले साहित्य निर्माण होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण, गॉर्की, स्टालिन आणि लेनिन यांच्यासारख्या व्यक्तींचे उत्तम साहित्य तुरुंगात असतानाच निर्माण झाले. क्रांतीची ठिणगीही अनेकदा अशाच ठिकाणी पडते, असे राऊत यांनी सांगितले.

त्या व्यक्तीला भगोडा म्हणणं पटत नाही; पुस्तक प्रकाशनापूर्वीच संजय राऊतांच्या विधानाने नवा वाद

तुरुंगातील कोठड्यांचा अनुभव सांगताना त्यांनी एक वेगळाच किस्सा उपस्थितांना ऐकवला. ज्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आले होते, तिच्या शेजारी 2 बीएचके हॉलसारखी प्रशस्त आणि सुंदर कोठडी होती. ती कोठडी आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी ते जेलरकडे करत असत. मात्र, लंडनच्या न्यायालयाला मानवी हक्कांचे पालन होत असल्याचे दाखवण्यासाठी ती कोठडी निरव मोदी किंवा विजय मल्ल्यासारख्या व्यक्तींसाठी राखून ठेवल्याचे जेलर सांगत असल्याचा दावा राऊत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना ते माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का, असा सवाल राऊत यांनी केला. अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी मोदी यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेले भाषण आपण तुरुंगात असताना ऐकले आणि लिहून काढले होते, असे त्यांनी सांगितले. समोर टेलिप्रॉम्प्टर नसताना केलेले ते उत्स्फूर्त आणि अराजकीय भाषण त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणांमधील उत्तम नमुना वाटल्याने त्याचा समावेश ‘बोध कीर्तन’मध्ये केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

आपणही इतरांसारखेच माणूस असून आपल्यालाही भावना आहेत आणि कविता आवडतात, असे राऊत म्हणाले. प्रसिद्ध कवी ग्रेस हे ‘सामना’च्या कार्यालयातील आपल्या कॅबिनमध्ये येऊन तासंतास बसत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली. ग्रेस यांच्यासह अनेक साहित्यिक मित्रांशी झालेल्या गप्पा, चर्चा आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून ‘बोध कीर्तन’ पुस्तकाला आकार मिळाला. साहित्यिकांशी असलेले संबंध आणि वेगवेगळ्या अनुभवांतून मिळालेला आशय या पुस्तकाच्या निर्मितीमागे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version