Sanjay Raut on Thackeray Together : ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही अहंकार , कटुता नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलं. मनसेप्रमुख (Thackeray) राज ठाकरेंनी एक हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. राज ठाकरे मुंबईत येऊ देत, मग चर्चा करूया. रोज या विषयावर चर्चा करू त्या विषयाचं गांभीर्य का घालवायचं ? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी उपस्थित केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या परदेशात असून ते मुंबईत आल्यावर या विषयी चर्चा करतील, तोपर्यंत या विषयावर कोणीही बोलू नये, अशा सूचना मनसेच्या नेत्यांनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, असं असलं तरी ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्यावरून माध्यमांत, राज्यातही चर्चा कायम असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही या विषयावर आज पुन्हा प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या एकीकरणाला कुणाचा विरोध; पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या प्रतिक्रिया काय?
लोकांच्या मनातील भावना आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात जे नातं आहे, कोणत्याही राजकीय व्यक्तीने मध्ये येऊन त्यांच्यात चर्चा करण्याची गरज नाही. मीसुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहात आहे, या दोघांचं नातं काय आहे, त्यांच्या एकमेकांप्रती भावना काय आहेत हे मला माहीत आहे. कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मलाही आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आपल्याकडून नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका खूप सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे, त्यांनी यावं.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला, सहभाग घेतला आणि महाराष्ट्र, मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रय्तन केला. त्या पद्धतीने रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोकं आता (आम्हाला) संपर्क साधायला लागले आहेत. आम्ही मराठी आहोत, मराठी म्हणून या मुंबईवर आपला ठसा कायम राहिला पाहिजे, अशा त्यांच्या भावना असल्याचे राऊतांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी चर्च असून सध्या परदेश दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मुंबईत आल्यावर काय निर्णय घेतात, ठाकरे बंधूंचं काय बोलणं होतं याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.