उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या एकीकरणाला कुणाचा विरोध; पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या प्रतिक्रिया काय?

Uddhav Raj Come Together : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा विषय अनेकदा आला आहे. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांच्या एकत्र येण्याच्या आशा कधी नव्हे इतक्या वाढल्या आहेत. (Raj) मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यात त्यांच्या पक्षाची दुसरी फळी अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
‘बडवे’च सर्वात मोठा अडथळा
एकेकाळी राज ठाकरे यांनी, ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’, असं म्हणत शिवसेना सोडली होती. आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करण्याची तयारी दाखवली असताना या दोन्ही नेत्यांभोवतीचे हेच ‘बडवे’च सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अटीचा उल्लेख करताना, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, असं सांगत मनसेने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल विचारला होता. तसंच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसेच्या मशिदीच्या भोंग्याविरोधातील आंदोलनावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर 17 हजार गुन्हे दाखल झाल्याचं सांगत जुना वाद उकरुन काढला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे यांना कळणार नसलं तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावा लागेल, असा टोला लगावला होता.
नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणं बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती. ठाकरे गटाकडून काही तासांमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही, असा खुलासा केला होता. हा खुलासा ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे.
फडणवीस काय म्हणाले
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक मोठा फटका भाजपला बसू शकतो. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर त्यामध्ये काहीही वाईट नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. घाई करु नका, थोडी वाट पाहा. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.