Sanjay Raut On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक कंपनी स्थापन केली असून ही कंपनी आता नागरी सहकारी बॅकांशी संबंधित कामकाज पाहणार असून याचा फटका महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना बसण्याची शक्यता असल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लोबोल केला आहे. संजय राऊत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, 8 ऑगस्ट रोजी अमित शाह (Amit Shah) मुंबईत आले, मात्र ते संसदेत आले नाहीत. त्यांनी एका कंपनीची स्थापना केली. ही कंपनी आता नागरी सहकारी बँकांशी संबंधित कामकाज पाहणार आहे. याचा फटका महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना बसण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्टला एक विधेयक मंजूर करून घेण्यात आलं. सहकार चळवळीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. मग महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचं नेतृत्व ही कंपनी का करणार? याबाबत महाराष्ट्र सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गुजरातमधील माधव बँक भ्रष्टाचारामुळे बदनाम झाली आहे. तिला वाचवण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे का? महाराष्ट्रातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचं अस्तित्व जवळपास संपवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे उपस्थित होते. त्यांना हा विषय का कळला नाही? ही गरज का निर्माण झाली? महाराष्ट्राची संपत्ती अशा पद्धतीने का दिली जात आहे? ही मनमानी महाराष्ट्राला मोठा फटका देणारी आहे. महाराष्ट्राने गुजरातच्या दारात भीक मागायची का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत? मी अमित शाह यांना मराठीत पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या घशात का घातलं जात आहे? हा मुद्दा आमच्या लक्षात आला नाही, असं अमित शाह यांना वाटत असेल पण हा मुद्दा आमच्याकडे आहे. संबंधित लोकांची भेट घेतल्यानंतर मी याचा अभ्यास केला आणि म्हणूनच अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही महाराष्ट्राची लूट आहे.
धनुष्यबाणाची चोरी
तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणाऱ्या सुनावणीवर देखील भाष्य करत अमित शाह, निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणाची चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. चोरलेला धनुष्यबाण हा ऑर्गनाइज्ड क्राईम आहे. अमित शाह, निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणाची चोरी केली आहे. आमचा विचार तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही मोदी आणि शाह यांचे बूट चाटता, आम्हाला शिकवू नका असं खासदार राऊत म्हणाले.
ऑनलाइन शिवीगाळ प्रकरण, मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल –
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणाऱ्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. तर पुढील सुनावणीत या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे.
