फडणवीसांना दिल्लीची आवड नसली तरी राष्ट्र साद घालतंय; संजय राऊतांचं मोठं विधान
एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी फेरबदल करायचा असेल तर एक तासही पुरेसा असतो, असे राऊत म्हणाले.
राजकारणात पतंग उडवणं स्वाभाविक आहे, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Shivsena) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत मोठं विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीची आवड नसली तरी राष्ट्र त्यांना साद घालत आहे. पंतप्रधानांना उत्तम कॅबिनेट बनवायचं असेल तर त्यासाठी ते फडणवीसांना सांगत आहेत, असे राऊत म्हणाले. घर बदलायचं असेल तर आवराआवर करावी लागते, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. फडणवीस यांना महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा असेल, मात्र त्यांच्या बाजूची काही मंडळी देव पाण्यात घालून बसली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यावेळी राऊत यांनी राज्यातील सत्तांतराच्या जुन्या घटनांचाही दाखला दिला. ‘ते पुन्हा येतील, असं सांगितलं जात होतं. मात्र, ते आले नाहीत. त्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालांना मॅनेज करावं लागले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागले, असा दावा त्यांनी केला. देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी फेरबदल करायचा असेल तर एक तासही पुरेसा असतो, असे राऊत म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण खात्यात अपेक्षित कामगिरी केली नसल्याने दबावाखाली राजीनामा द्यावा लागल्याचा दावाही त्यांनी केला. तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल तर सरकार तसे करेल, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने विनोद तावडे महत्त्वाचे आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवीन टीम तयार करून काम करतो, असंही राऊत यांनी नमूद केलं.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही राऊत यांनी भाष्य केलं. कपिल सिब्बल आज आपला युक्तिवाद संपवतील, त्यानंतर फुटीर गटाला चार ते पाच दिवसांचा वेळ लागू शकतो आणि संपूर्ण प्रक्रिया दीड महिन्याच्या आसपास चालू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान जनतेला नवीन विषय देतात, ही चांगली गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला लगावत राऊत यांनी नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरून सरकारला लक्ष्य केलं. नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारी तिजोरीतून प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत, मुख्यमंत्री यांनी महापौर आणि उपमहापौरांना सोबत घेऊन पाहणी करावी, तसंच महापौर आणि आयुक्तांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
परिवहन विभागाच्या कार्यक्रमावर बोलताना राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवरही टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात मिंदे गट आणि भाजपमध्ये दरी वाढत चालली आहे, म्हणून ते दरे गावाला जातात, असा टोला त्यांनी लगावला. सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा सरकारने मंजूर केल्यानंतर ही पहिलीच केस असल्यास त्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही ते म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिंदे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चाचपणी केली होती, दिल्लीत बैठका घेतल्या जात होत्या आणि त्यांना सत्तेत जायचं असल्याने अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील त्यांचा प्रवास रात्रीचा असायचा. आम्हाला वेळोवेळी त्याची माहिती मिळत होती, असंही राऊत यांनी सांगितलं.