मोठी बातमी! नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दोन हल्लेखोर पसार

दोन्ही आरोपी मोपेडवरून आल्याची माहिती समोर आली असून त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात आहे.

News Photo   2026 08 26T084346.038

नागपुरातील वाठोडा परिसरात काँग्रेसचे (Crime) नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास दोन अज्ञात तरुण मोपेडवरून आले आणि त्यांनी मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. या गोळीबारात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र घराच्या काचा फुटून नुकसान झाले आहे

गोळीबार झाला त्यावेळी शुभम मोटघरे हे घराच्या बाल्कनीत होते, तर त्यांची 5 वर्षांची मुलगी दरवाजाजवळ उभी होती. अचानक झालेल्या गोळीबारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोर अत्यंत वेगाने आले आणि गोळीबार केल्यानंतर काही क्षणांतच ते निघून गेल्याची माहिती मोटघरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही आरोपी मोपेडवरून आल्याची माहिती समोर आली असून त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात आहे.

दरम्यान, शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वैमनस्य, वैयक्तिक कारण किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. आरोपींचा शोध सुरू असून तपासातून गोळीबारामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

follow us