शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार (Shivsena) असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 5 खासदार हे संसदेत वेगळा गट निर्माण करणार असल्याचीही बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच अस्वस्थता पसरली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल तातडीने दिल्लीला गेले होते. संजय राऊत यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. नऊही खासदार आमच्यासोबत आहेत असंही ते म्हणाले.
कोणी कुठेच जाणार नाही. या खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत आणाभाका घेतल्याचा दावाही राऊत यांनी केला. इतकेच नव्हे तर मातोश्रीत घडलेल्या बैठकीतील घडामोडींची माहितीही राऊत यांनी मीडियाला दिली आहे. खासदारांच्या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटात अस्वस्थता होती. मातोश्रीत घडामोडींना वेग आला होता. मातोश्रीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींना वेग आला होता. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.
शिवसेना ठाकरेंचे खासदार वेगळ गट स्थापन करणार?, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
यावेळी त्यांनी खासदार फुटणार असल्याच्या सर्व अफवा असल्याचं जाहीर केलं. मातोश्रीच्या बैठकीत काही खासदार ऑनलाईन होते. चार दिवसांपूर्वी झालेल्या या मिटिंगला सर्व खासदार होते. सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या खासदारांनी साहेब आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत.
शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहू, हिंदुत्वाचं पालन करू, असं या खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, अशी माहिती राऊत यांनी दिली. त्याचबरोबर या खासदारांनी आईवडिलांची शपथ घेतली. कुणी मुलांची शपथ घेतली. कुणी आई भवानीची शपथ घेतली. कुणी तुळजा भवानीची शपथ घेतली तर कुणी साईबाबांची शपथ घेऊन आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. लोकं ऑनलाईन पूजा करतात. तशी या खासदारांनी ऑनलाईन शपथ घेतली, असं राऊत म्हणाले.
कुणीही वेगळा गट स्थापन करणार नाही. कुणीही कुठे जाणार नाही. नऊ खासदार आमच्यासोबतच आहे, असं सांगतानाच ज्यांना जायचं असेल तर जा, असं उद्धव ठाकरे कुणालाही म्हणाले नाहीत. मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे पक्ष सोडणार असं होत नाही. माझं पंतप्रधानांकडे काम असेल तर मी त्यांना भेटायला जाईल. याचा अर्थ वेगळा होत नाही. काल संध्याकाळी मी मुंबईत होतो. नंतर दिल्लीत होतो. सुविधा आहे. शिवसेनेचे 9 खासदार आमच्या सोबतच आहेत, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
