मुंबई : आपल्या डान्सच्या आदांनी तरुणाईला वेड लावणाऱ्या डान्सिंग क्वीन गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमी डान्स करण्याच्या निमित्ताने अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील विरोधात तक्रार केल्यानंतर सातारा कोर्टाने डान्सर गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला.
याप्रकरणी प्रतिभा शेलार म्हणाल्या की, अश्लील हावभाव करणे, तोकडे कपडे घालणे हे प्रकार लोककलेत आणि लावणीत येत नाहीत. पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अश्लील नृत्य करण्याला प्राधान्य देतात आणि लोककलावंत म्हणून स्वतःची ओळख करून देतात असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला. तर गौतमी पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला.
दरम्यान या प्रकरणावर गौतमीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी म्हणाली, मी पूर्वी चूक केली होती पण आता मी ही चूक करत नाही. माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. जर चूक केली तर माझ्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करू शकता. पण चूक केली नसताना उगाच माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करायची हे अन्यायकारक आहे.
मृणाल कुलकर्णीने देखील तक्रार दाखल केली होती
गौतमी विरोधात मृणाल कुलकर्णी यांनी देखील साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. कलावंताने आपली मर्यादा राखली पाहिजे. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर दुर्दैवाने एका कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असे मृणाल यांनी म्हटलं होतं.