Download App

Sharad Pawar : आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज राज्यातच नव्हेत तर देशात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अजूनही पूर्णत्वाला गेली, असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे ,असं म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन यांचे ते आदिवासी हेच खरे मालक आहेत, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केलं.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 2022 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे अझीम प्रेमजी (Azim Premji) यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे त्या कार्यक्राचे अध्यक्षस्थान शरद पवार यांनी भूषवले होते. त्यावेळी ते बोलत होते.

जंगल आणि त्यासंबंधीचा जो संघर्ष होतो. तो संघर्ष करण्यासाठी जे वरती येतात त्यांचा आदिवासींसंबधी जे ज्ञान आहे ते ज्ञान एकादृष्टीनं अज्ञानच आहे.आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती जी राहिली, ती आदिवासींनी सांभाळलेली आहे. त्यामुळे वनसंपत्तीवर खरा अधिकार त्यांचा आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

पवार म्हणाले, जल, जंगल आणि जमीन हा जगातील महत्वाचा दुवा आहे. यातील जंगल वाचवण्याचे काम आदिवासी लोकांनी केलं. आदिवासी समाजामुळंच पर्यावरण टिकून राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी, त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी जे लोक प्रयत्नांची परीक्षा आणि वेळ प्रसंगी संघर्ष करतात. त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या लोकांच्या मालिकेमध्ये प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी व्यासपीठावर आहेत, ते पाहून पवार यांनी समाधान व्यक्त केले.

या आदिवासी समुहाच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात ठेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याला शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही, या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल, अशी खात्री पवारांनी दिली.

दरम्यान, यशंवतराव चव्हाण यांचा जीवनपटही पवारांनी उलगडला. यशवंतराव चव्हाण यांनी उभं आयुष्य देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी दिले. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानवयात पितृछत्र हरवलं. त्यानंतर मातेच्या छत्रछायेखालील त्याची जडणघडण झाली. त्यांची सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात एखादी व्यक्ती जन्माला आली आणि कठीण परिस्थितीत कष्ट करण्याचा प्रयत्न करते, याचे उत्तम उदाहरण यशवंतराव चव्हाण, पवार म्हणाले.

Ajit Pawar यांच्याशी दुराव्याबद्दल संजय काकडे म्हणतात…

ते म्हणाले, त्यांच्या घरात फारसं कुणी शिक्षित नव्हतं. त्यांचे बंधू हे टेक्स्टाईलमध्ये काम करत होते. तेही गेले. मातेचा आश्रय मात्र त्यांना अनेक वर्षे लाभला. यावेळी पवारांनी त्यांच्या मातेचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या गावी लोकांनी दिवाळी साजरी केली. काही जण त्यांच्या त्यांच्या मातोश्रींना भेटायला गेले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मातोश्रींना पेढे दिले. त्यावेळी विठाबाई यांनी पेढे कसले अशी विचारणा केली. त्यावेळी यशवंतराव मुख्यमंत्री झाले असे त्या लोकांनी सांगितले. त्या माऊलीला मुख्यमंत्री म्हणजे काय माहीत नव्हते. तिने त्यांना प्रश्न विचारला आपल्या गावच्या तहसीलदाराइतका मोठा झाला का? त्यांच्यादृष्टीने त्यावेळी तहसीलदार, फौजदार हेच मोठे होते. महाराष्ट्र चालवण्याचे सूत्र त्यांच्या हातात होते. त्यांच्या पदाची जाण मातोश्रींना नव्हती. अशी पार्श्वभूमी चव्हाणसाहेबांच्या घरची होती हेही आवर्जून सांगितले.

चव्हाण यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत काम केले. अनेक वर्षे तुरुंगात गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विधीमंडळात गेले. मंत्री म्हणून काम केले. आणि 1956 नंतर गुजरात – महाराष्ट्र एकत्र होता, त्यावेळी एकत्रित राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी पडली. सामान्य माणसाला मराठी लोकांचे राज्य हवे होते. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती आणि त्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली.

1962 मध्ये देशावर युध्दाचे संकट आले. त्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला 20 वर्षात विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री या सरकारमधील महत्वाच्या पदावर काम केलं. उत्तम प्रशासक, देशाचा विचार करणारा नेता आजही त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. असेही शरद पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात कसे असावं, याचं आदर्श यशवंतराव चव्हाण होते. ते गेल्यानंतर काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी काही लोकांवर टाकली होती. त्यात माझाही थोडा सहभाग होता असं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, इतकी वर्षे सत्तेच्या राजकारणात असलेल्या या व्यक्तीची त्यांच्या निधनानंतर साधनसंपत्ती ही कितपत असावी? आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांच्या बँकेचे खात्यात फक्त २७ हजार रुपये होते, असं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा सभागृहाच्या दारासमोर एकच पुतळा आहे, तो यशवंतराव चव्हाण यांचा आहे. तो पुतळा हेच सांगतो की, संसदेच्या सभागृहात तुम्ही जात आहात, त्यावेळी संसदीय संस्थेची प्रतिष्ठा याच्यात कधी तडजोड करू नका. सुसंस्कृतपणा कधी सोडू नका, असं ते म्हणाले.

Tags

follow us