Ajit Pawar यांच्याशी दुराव्याबद्दल संजय काकडे म्हणतात…
पुणे : माझी राजकारणातील सुरुवात पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन काँग्रेस (Congress) नेते रामकृष्ण मोरे (Ramkrushna More) यांच्यामुळे झाली. त्यांनीच माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची पुणे जिल्हा बँकेच्या कार्यालयात भेट घालून दिली आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप उपयोगी पडाल, असे म्हटले. तेव्हापासून माझी आणि अजित पवार यांची मैत्री झाली. पुढे मी माझा व्यवसाय वाढवत गेलो. अजित पवार हे राज्याचे नेते झाले. त्यामुळे आमच्या नियमित भेटीगाठी कमी झाल्या. तसेच आमच्या दोघांची मैत्री काही लोकांना पटत नसल्याने एकदा अजित पवार हेच मला म्हटले, आपण थोडे लांब राहु. अजित पवार यांच्याशी माझे कोणतेही वाद, मतभेद किंवा कोणत्या व्यवहारावरून काहीही फिस्कटलेले नाही. कारण मी अत्यंत छोटा माणूस आहे. तर अजित पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आमच्यात काही वाद होण्याचे कारण नाही. आम्ही नियमितपणे भेटत जरी नसलो तरी आमची मैत्री कायम आहे. आम्ही ठरवून लांब राहिलो आहे, असा दावा माजी राज्यसभा तथा भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, मागील सात-आठ वर्षात त्यांच्यामध्ये दुरावा, वाद, व्यवहारावरून फिस्कटल्याच्या चर्चा सुरु आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला. या पराभवाला मी कारणीभूत आहे. त्यामुळे माझ्यावर कारवाई करा, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संजय काकडे यांनी केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर ‘लेट्सअप’ने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि आपल्या नात्यासह इतर अनेक गोष्टीवर परखड मतं मांडली.
Kirtikumar Bhangdiya भाजप आमदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा
संजय काकडे म्हणाले की, सन १९९६-९७ साली पिंपरी-चिंचवडमध्ये माझी दीड हजार फ्लॅटची एक स्कीम झाली होती. तेव्हा काँग्रेसचे नेते रामकृष्ण मोरे यांनी माझा एक उमेदवार हनुमंत गावडे हे निवडणूक लढवत आहे. तुझ्या स्कीममधील फ्लॅटधारकांना मदत करायला सांग, असे सांगितले. तेव्हापासून माझी खऱ्या अर्थाने राजकीय वाटचाल सुरु झाली. पुढे रामकृष्ण मोरे यांनीच अजित पवार यांच्याशी माझी ओळख करून दिली. मला माझ्या भावाने घरातून बाहेर काढले होते. तेव्हा शरद पवार, अजित पवार यांनीच मला मदत केली होती. हे जगजाहीर आहे. पुढे माझा व्यवसाय वाढत गेला तसा अजित पवार हे देखील राज्य पातळीवरचे मोठे नेते म्हणून उदयास आले. त्यादरम्यान आमची मैत्री काही लोकांच्या नजरेत येत असल्याने आम्ही ठरवून लांब राहिलो. त्यात मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांना न विचारता राज्यसभेच्या खासदार पदासाठी अर्ज भरला. तसेच त्यानंतर मी भाजपचा सक्रिय कार्यकर्ता झालो. त्यामुळे कदाचित अनेकांना आमच्यात दुरावा झाला असे वाटत आहे. परंतु, आमच्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही. आम्ही नियमितपणे भेटत जरी नसलो तरी आमची मैत्री कायम आहे.
संजय काकडे म्हणतात की, अजित पवार आणि माझ्यात दुरावा होण्याचे आणखी एक कारण असू शकते. ते म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन झाल्यापासून तिथे कधीही भाजपची सत्ता आली नव्हती. पण आधी शरद पवार, अजित पवार यांना न विचारता राज्यसभेसाठी अर्ज भरला, पुढे २०१४ नंतर भाजपमध्ये गेलो. २०१७ ला पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर ९२ नगरसेवक निवडून आणेल असे म्हटलो होतो. तसेच त्याप्रमाणे नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे साहजिकच आहे की शरद पवार, अजित पवार यांना वाटत असेल की आपल्याच जीवावर मोठा झालेला माणूस आपल्याच विरोधात उभा राहत आहे. त्यामुळे नाराज होणे साहजिकच आहे. पण त्यामुळे आमच्यात काही वाद आहे, असे अजिबात नाही.