Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेचे तीव्र पडसाद ( Santosh Deshmukh ) हिवाळी अधिवेशनातही उमटताना बघायला मिळाले. विरोधकांनी याप्रकरणी सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात निवेदन सादर केलं.
माझ्या वडिलांना जसं मारलं तशीच कठोर शिक्षा करा; संतोष देशमुख यांच्या मुलीने फोडला टाहो
या प्रकरणावरून राजकारण रंगलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये जाणार असून यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आज बीडमध्ये याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शरद पवार घेणार देशमुख कुटुंबियांची भेट
शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. ते थोड्याच वेळात बीडच्या दिशेने रवाना होणार आहेत. तिथून ते मस्साजोग या गावी जाणार असून तिथे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून निवेदन सादर
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत या प्रकरणी निवेदन सादर केलं. यावेळी बोलताना बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आता हा मुद्दा राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.