Monika Rajale : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वीच शेवगाव पाथर्डी मतदार संघातील (Shevgaon Pathardi Constituency) भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह बाहेर येऊ लागला आहे. यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांना वगळता कोणालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असे झाले तरच आपण भाजपासोबत राहू, अन्यथा वेगळा विचार करू, अशी भूमिका पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भाजप निष्ठावंत मुंडे समर्थक व राजळे विरोधकांनी घेतली आहे. यामुळे मोनिका राजळे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
राजळेंना स्वपक्षातूनच आव्हान…
मुंडेंसह इच्छुक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अंतर्गत वाढलेली गटबाजी थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये निर्धार मेळावा घेत एकप्रकारे विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. तसेच राजळेंना उमेदवारी देण्यात आली तर भाजपाला याचा फटका बसेल तसेच आपणही इच्छुक असल्याचे बोलत मुंडे हे विधानसभा रिंगणात उतरले आहे.
तर त्याचबरोबरीने पाथर्डीमधून भाजपचे पदाधिकारी गोकुळ दौंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहे. यामुळे आमदार राजळे यांच्यासमोरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे. शेवगाव-पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महायुतीकडून तिकिटासाठी फिल्डिंग लावत आहे. मात्र असे असताना स्वपक्षातूनच त्यांना आव्हान निर्माण झाले आहे. भाजपकडून अरुण मुंडे यांच्यासह गोकुळ दौंड हे देखील इच्छुकांच्या यादीत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे यांनी लढण्याची जोरदार तयारी केलीय. या तिघांशिवाय जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनाही यावेळी लढायचंय. शिवाय भाजपमध्ये राजळेंना विरोध करणारा गट व इतर अपक्षही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
यामुळे राजळे अडचणीत
गेली दोन टर्म म्हणजेच 2014 व 2019 या दोन्ही टर्ममध्ये भाजपकडून मोनिका राजळे यांना तिकीट देण्यात आले व त्यांनी आमदारकीला गवसणी देखील घातली. मात्र 2019 नंतर त्यांचा जनसंपर्क हळूहळू मतदार संघामध्ये कमी कमी होऊ लागला.
IND vs PAK Hockey: ‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा
यातच शेवगाव व पाथर्डी मतदार संघामध्ये पाण्याचा प्रश्न हा अत्यंत जटील आहे. रस्ते तसेच अनेक नागरी सुविधांचा वनवा मतदार संघातही कायम आहे. यामुळे यंदा 2024 च्या निवडणुकीमध्ये मोनिका राजळे यांना या सर्व अडचणीचा सामना करावा लागणार आहे.