Sanjay Gaikwad Statement On Maharashtra Local Body Election : बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला.
गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले की, पूर्वीच्या तुलनेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) खूप खर्चिक झाल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवाराला एक-दोन कोटी, तर कधी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी 100 बोकड द्यावे लागतात, अशी परिस्थिती झाली आहे. एवढ्या मोठ्या खर्चामुळे सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे (Election) अशक्यप्राय ठरते. त्यांनी मग काय करावे? राजकारणातून दूर व्हावे का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च, तर 100 बोकड द्यावे लागतात. आम्हाला भाजप-शिवसेना (BJP) युती पाहिजे. मात्र, ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. – संजय गायकवाड, आमदार
शिवसेना (Eknath Shinde) शिंदे गट आणि भाजप युतीविषयी बोलताना गायकवाड यांनी स्पष्ट केले की, आम्ही महायुतीला प्राधान्य देतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपण एकत्र लढतो, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकांच्या बाबतीत त्यांना मोकळे सोडले जाते. हे योग्य नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
तसेच त्यांनी चिखली आणि मलकापूरमधील युतीसंदर्भातील धोरणांचा उल्लेख करत बुलढाण्यातही तसेच धोरण लागू झाल्यास आपण तयार असल्याचे सांगितले. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांची बेधडक शैली चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच त्यांना वादग्रस्त विधानांबाबत तंबी दिली होती, तरीही गायकवाड यांनी आपली मोकळेपणाची शैली कायम ठेवली आहे.