Download App

‘देवाभाऊ, अभिनंदन!’ ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, काय आहे कारण ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक

  • Written By: Last Updated:

Saamana editorial on CM Fadnavis : ‘एक तर मी राहीन, नाहीतर तू राहशील’,अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंची काही प्रमाणात भाषा बदलल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या आणि महायुतीच्या नेत्यांवर आग ओकणाऱ्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक करण्यात आले आहे. हा प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण,गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे ‘सामना’च्या अग्रलेखातून कौतूक करण्यात आले आहे. ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच ‘देवाभाऊ, अभिनंदन!’ हा अग्रलेखाचा मथळाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये बीडमधील गुन्हेगारीचा पुसटसा उल्लेख असला तरी उर्वरित अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे हा अग्रलेख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

‘सामना’च्या अग्रलेखात नेमकं काय?

गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

नव्या पर्वाचा हवाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच सकारात्मक म्हणावे लागेल.

खाणसम्राटांचे टक्के

विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील हे चित्र बदलायचे ठरवले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी मोटरसायकलवरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते. तथापि, त्यांचे हे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठरावीक खाणसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले. तथापि, संभाव्य पालकमंत्री फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काही तरी करतील, तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील, असे एकंदरीत दिसत आहे, असा विश्वास ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

follow us