राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच (Shinde) वार वाहत असून अनेक ठिकाणी युती आघीड बिघडल्याचं चित्र आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिट चर्चा झाली आहे.
भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करावे म्हणून मी अमित शाहांना भेटलो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो, अशी प्रतिक्रिया राज्यातील महायुतीच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सूरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीत नव्हताच, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
शिंदे गटात फूट; 20 आमदार भाजपसोबत जाणार, उबाठा गटाचे नेते खैरेंचा मोठा दावा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे, मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केला आहे. विरोधकांना यामुळे आयतं कोलीत मिळतंय, मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे.
कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे.
