Download App

Shivrajyabhishek Din : लोकसभेची भीती, मोदींचा मौल्यवान वेळ; शिंदे सरकारचं अ‍ॅडव्हान्स सेलिब्रेशन

Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर प्रत्यक्षात उपस्थित होते. (Shivrajyabhishek Din Sohala on Raigad fort in the presence of Pm Narendra Modi and Cm Eknath Shinde)

मात्र आजचा साजरा झालेला हा शिवराज्याभिषेक दिन हा 350 वा नाही तर 349 वा असल्याची माहिती पुढे येत आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पुढच्या वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणूक आणि राजकीय वातावरणात शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करता येणार नाही, या भीतीमुळेच सरकार 349वा सोहळ्याला 350 वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे, असं या वृत्तात म्हटले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जूनला मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपासून हा लोकत्सोव केल्याच दिसून येत आहे. या सोहळ्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होत असतात. यंदा या सोहळ्याला पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक मंत्री उपस्थित होते. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेही रायगड किल्ल्यावर उपस्थित होते.

349 वा राज्याभिषेक सोहळा :

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला होता. तेव्हापासून 2023 पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा 349 वा राज्याभिषेक दिन आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी म्हणजे 2024 सालचा शिवराज्याभिषेक दिन 350 वा असणार आहे.

शासनाच्या सोहळ्यावर इतिहास संशोधकांची टीका :

दरम्यान, राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी 349 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा आणि इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी लोकमतशी बोलताना केला. ते पुढे म्हणाले, हा प्रकार म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना दिग्गज मंडळींना नालायक ठरविण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता डोळसपणे याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

6 जूनला होणारा राज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी का?

दरम्यान, दरवर्षी 6 जूनला हा सोहळा होत असतो. पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे, असाही दावा लोकमतने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे. 6 जूनचा सोहळा 2 जूनलाच पार पडल्यानंतर 6 जूनला काय करणार? 2 वेळा शिवराज्याभिषेक करणार का? असाही सवाल या वृत्तात विचारण्यात आला आहे.

Tags

follow us