Shri Kshetra Bhimashankar Darshan begins : पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिरातील सुरू असलेल्या पुनर्बांधणी आणि विकासकामांमुळे गेल्या काही महिन्यांपासून दर्शन व्यवस्था बंद होती. आता सर्व प्रमुख कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने 15 जूनपासून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मंदिर दर्शनासाठी 9 जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले होते. मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे पुनर्बांधणीचे काम, परिसरातील विकासकामे आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यभरातील तसेच देशभरातील लाखो शिवभक्तांना भीमाशंकर दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. सुरुवातीला 31 मे रोजी मंदिर खुले करण्याचा विचार होता, मात्र काही कामे अपूर्ण असल्याने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. आता 15 जून ही नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी तसेच भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 288 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पायरी मार्ग, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा समावेश आहे.
मुख्य सभामंडपाची पुनर्बांधणी हे या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचे काम मानले जात आहे. जुन्या सभामंडपाचा संपूर्ण भाग काढून त्याऐवजी दगडी बांधकामात नवीन सभामंडप उभारण्यात येत आहे. हे बांधकाम पारंपरिक वास्तुशैली जपत करण्यात येत असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सभामंडपाच्या डोमचे काम जवळपास पूर्ण झाले असून मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे सुमारे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.
सरकारने मान्य केल्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या; अडीच तासांच्या चर्चेनंतर उपोषण स्थगित
मंदिराच्या पुनर्बांधणीमध्ये एकूण 870 दगडांचा वापर करण्यात येत असून त्यापैकी सुमारे 200 दगड बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. तसेच परिसरातील राडारोडा हटविणे, साफसफाई करणे आणि अंतिम स्वरूप देण्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. उर्वरित सर्व कामे येत्या 15 दिवसांत पूर्ण करून मंदिर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, मंदिर सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली आहे. दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून नोंदणीशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 5 जूनपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
भाविकांना श्री भीमाशंकर अधिकृत संकेतस्थळ shreebhimashankar.com वर जाऊन दर्शनासाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे. गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने दररोज केवळ एक हजार भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. 15 जून ते 30 जून या कालावधीत सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत दर्शन व्यवस्था उपलब्ध असेल.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या प्रत्येक भाविकाने मंदिरात प्रवेश करताना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. नोंदणीची पुष्टी आणि ओळखपत्र तपासल्यानंतरच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नव्याने विकसित होत असलेल्या मंदिर परिसरामुळे भाविकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सुविधायुक्त दर्शनाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
