Mumbai Police : मुंबईत सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या (Mumbai Police ) कार्यपद्धतीवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. मुंबई कॉंग्रेसने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरुन चांगलंच घमासान पेटलंय. व्हिडिओत पोलिस विद्यार्थ्याला धमकी देत आहे. या घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला असून गणवेशात दिसत असलेल्या पोलिसाला सध्याच्या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेसने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, “जर हे खरे असेल, तर हा केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न नाही, तर लोकशाही हक्कांवर थेट हल्ला आहे. आवाज उठवणे हा गुन्हा नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे जबाबदारीने दिली पाहिजेत, धमक्यांनी नव्हे.
तपासाअंती धमकी देणाऱ्या त्या पोलिसाची संपूर्ण माहिती समोर आली आहे. त्या कर्मचाऱ्याचे नाव पवन सांगळे आहे. पवन सांगळे हा सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. पोलीस प्रशासनाने या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत पवन सांगळेला त्याच्या सध्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
विद्यार्थी आंदोलने दडपण्याच्या मुंबई पोलिसांच्या पद्धतींवरही टीका होत आहे. आंदोलकांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग आणि घरोघरी भेटी देत आहेत. ज्या आंदोलकांची नावे आधीच एफआयआरमध्ये आहेत किंवा ज्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांना थेट स्थानिक पोलीस ठाण्यांमधून फोन कॉल्स आणि व्हॉट्सॲप संदेश येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं असून ते म्हणाले, एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी केली जात आहे. मात्र चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलं आहे,” असं या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकांना घरीच राहण्याचे आणि त्यांचे व्हॉट्सॲप लाईव्ह लोकेशन सतत शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, BNSS च्या कलम 35(3) अंतर्गत पहाटे मेसेजिंग ॲप्सद्वारे डिजिटल कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या, ज्यामध्ये लोकांना पूर्वी झालेल्या सभासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.
