Download App

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या जमिनींची चौकशी; SIT स्थापन, अंजली दमानियांच्या मागणीची दखल

राजेंद्र घनवटने बीड मधील अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडप केल्याचा आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता.

Maharashtra News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणाऱ्या राजेंद्र घनवटच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राजेंद्र घनवटने बीड मधील अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडप केल्याचा आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता. सदर शेतकऱ्यांसोबत अंजली दमानिया यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. कागदपत्रे मंत्री बावनकुळे यांना दिली होती. यानंतर या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेण्यात आली आहे. राजेंद्र घनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या जमिनींची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने याबाबत आदेश दिले आहेत.

या एसआयटी पथकाच्या अध्यक्षपदी पुणे विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख आणि पुणे अपर जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. या पथकामार्फत घनवट व त्यांचे कुटुंबीय व मे. घनवट अॅग्रो प्रा. लिमिटेड यांच्या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झाले आहेत याची चौकशी केली जाणार आहे.

राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांच्याशी संलग्न इतर संस्था, कंपन्यांसाठी अकृषक कारणासाठी वर्ग केलेल्या जमिनी, किती खरेदी व्यवहारांत बाजारभावापेक्षा कमी मोबदला रक्कम देऊन खरेदी झाली आहे, अनुसूचित जमाती खातेदारांच्या जमिनी तसेच नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी व्यवहारांत किती प्रकरणात विनापरवानगी खरेदी व्यवहार झाले आहेत यांसह अन्य काही गोष्टींची चौकशी या पथकामार्फत केली जाणार आहे. या सर्व बाबींची चौकशी करून सविस्तर अहवाल एक महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारला सादर करावा अशी सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू; दमानियांचं ट्विट

राजेंद्र घनवटांच्या पत्नीचं निधन

पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत असतानाच राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. परंतु आता हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केलं होतं. त्यांच्या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती.

follow us