Mayor Jyoti Gade : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.या पाहणीवेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सोलर प्रकल्पाची पाहणी करताना नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी महापौर गाडे (Mayor Jyoti Gade) म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल आणि वीज निर्मिती अखंडित सुरू राहील.
त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोलर प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला.
यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली.महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
