नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये हनिमून कांड; TTE निलंबित, AC कोच सजवणाऱ्या डेकोरेटर FIR

Honeymoon Coach Row : ट्रेनचा फर्स्ट एसी कोच 'हनीमून सूट'प्रमाणे सजवल्याच्या व्हायरल व्हिडिओवर भारतीय रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.

Nandigram Express Decoration

Nandigram Express Decoration

ट्रेनचा फर्स्ट एसी कोच ‘हनीमून सूट’प्रमाणे सजवल्याच्या व्हायरल व्हिडिओवर भारतीय रेल्वेने कठोर कारवाई केली आहे. परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश करून केबिन सजवणाऱ्या डेकोरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल तैनात असलेल्या टीटीईला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेने बुधवारी रात्री 9 0वाजण्याच्या सुमारास ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.

कोणत्या ट्रेनमध्ये करण्यात आली होती सजावट?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 6 जुलै 2026 रोजी घडली. नंदीग्राम एक्सप्रेसने (ट्रेन क्रमांक 11002) प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी डबा सजवण्यासाठी एका डेकोरेटरला ऑनलाइन बुक केले होते. तो डेकोरेटर जालना स्टेशनवर तिकीट आणि परवानगीशिवाय ट्रेनमध्ये चढला. सजावट पूर्ण झाल्यावर त्याने एक व्हिडिओ चित्रित केला, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेने कठोर कारवाई केली.

डेकोरेटरवर गुन्हा दाखल

डब्यात अनधिकृत प्रवेश ही एक मोठी चूक मानून, कर्तव्यावर असलेल्या मुख्य तिकीट निरीक्षकाला (TTE) तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तिकीटाशिवाय प्रवास करणे, परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश करणे आणि रेल्वे कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल डेकोरेटरविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत होते?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट एसी कोचमधील एक केबिन दिसत आहे, जिचा दरवाजा उघडा असून त्यावर गुलाबी रंगाचा हृदयाच्या आकाराचा पडदा आहे. कोचमधील सजावट एखाद्या रोमँटिक सूटपेक्षा कमी नव्हती. केबिनच्या फ्लोअरवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या आणि छताला लाल व पांढरे फुगे लावलेले होते. आसनावरील पांढऱ्या चादरीवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवून एक मोठे हृदय तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.  शिवाय, वरच्या आसनावर ठळक अक्षरात ‘आय लव्ह यू’ लिहिलेले आहे. कोचमध्ये फुलांच्या आणि गुलाबांच्या माळा लावलेल्या आहेत. तर, संपूर्ण कॅबिन पिवळ्या एलईडी दिव्यांनी सजवलेली आहे आणि पार्श्वभूमीवर सलमान खानचे प्रसिद्ध गाणे ‘जग घुमेया थारे जैसा ना कोई…’ वाजत आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर  जोरदार चर्चा सुरू झाली. लोकांनी रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करून ट्रेनमध्ये अशा गोष्टीला परवानगी आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. सुरुवातीला, काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, डबा बुक केलेला असल्याने मालमत्तेचे नुकसान न करता हे करता आले असते. मात्र, दक्षिण मध्य रेल्वेने आता स्पष्ट केले आहे की, बाहेरील व्यक्तींनी ट्रेनमध्ये प्रवेश करून ती सजवणे हे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

Exit mobile version