Split in BJP, 9 corporators split : भिवंडी महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला अधिकृत उमेदवार बदलल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपमध्येच दोन गट पडल्याचे चित्र समोर आले असून महापौरपदाची खुर्ची नेमकी कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यापूर्वी भाजपने नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी अधिकृत उमेदवार घोषित केले होते आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र ऐनवेळी भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी स्नेहा मेहुल पाटील यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. याबाबतचे लेखी पत्र सर्व भाजप नगरसेवकांना देण्यात आले.
या निर्णयामुळे नारायण चौधरी नाराज झाले असून त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. मात्र महायुतीतील घटक पक्ष साथ देण्यास तयार नव्हते. अनेक बैठकांनंतरही तोडगा निघाला नाही. त्यातच भाजपने स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतल्याने सत्तानाट्य रंगले आहे.
दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याची माहिती असून तब्बल 9 नगरसेवक फुटल्याचे सांगितले जात आहे. नारायण चौधरी हेच अधिकृत उमेदवार होते आणि स्नेहा पाटील या ‘डमी’ उमेदवार असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. चौधरी काँग्रेसकडे झुकल्याने भाजपच्या एका गटात नाराजी वाढली आहे.
आयटी कंपन्यांना इशारा! २०३० पर्यंत बीपीओसारख्या नोकऱ्या गायब होतील, काय म्हणाले खोसला?
महायुतीकडे भाजप आणि शिवसेना मिळून एकूण 34 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 46 या आकड्याची गरज असून त्यासाठी कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मात्र महापौरपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातही मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
भिवंडी महापालिकेतील एकूण 90 जागांपैकी सध्याचे पक्षनिहाय चित्र असे आहे:
काँग्रेस – 30
भाजप – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 12
शिवसेना – 12
समाजवादी पक्ष – 6
कोणार्क विकास आघाडी – 4
भिवंडी विकास आघाडी – 3
अपक्ष – 1
बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता असल्याने प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेत महापौरपदासाठी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
