Download App

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल जाहीर, वाशिममधील शाळा ठरली अव्वल

  • Written By: Last Updated:

मुंबई : शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (Mazi Shala Sunder Shala) अभियानात शासकीय शाळा गटात प्रथम पारितोषिक वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा (साखरा) (Zilla Parishad School sakhara) पटकावले. तर खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले.

Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि ठाकरेंवर टीका, ‘अडीच दिवस मंत्रालयात..’ 

शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) यांनी मिळविला. तर खाजगी शाळा गटात शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (ता. बारामती जि. पुणे) द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योनजेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे.

बक्षिसांची रक्कम 66 कोटी
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस 51 लाख, द्वितीय क्रमांक 21 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस 11 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभियानात राज्यस्तरावर-1, बृहन्मुंबई मनपा-1, अ व ब वर्ग मनपा-1, विभागस्तरीय-8, जिल्हास्तरीय-36, तालुकास्तरीय-358 अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे असेल. 8 विभागीय स्तरावर पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख, तिसरे 7 लाख रूपयांचे, जिल्हास्तरावर पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख रुपये, अशी 66 कोटी 10 लाखाची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम नियमितपणे राबविणार
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला. या उपक्रमातून शाळांच्या बाह्य घटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले.

गिनीज बुकने घेतली दखल
वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञामध्ये सहभाग घेतला असून शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेत स्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान पेपर लेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आल्याचे सांगून केसरकर यांनी सांगितले, वीज बचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपक्ररणाचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले.

follow us