पुणे : एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज, 31 जानेवारी) ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार असून मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तर एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात आला.
या आंदोलनावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थी आंदोलकांना भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. असे सांगत या आंदोलनास आपला पाठिंबा दिला.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगण्यात आल्या.
यावर बोलताना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांच्या मागण्या या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या जातील आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिले. मात्र, 2025 पासून हा नवीन पॅटर्न लागू करण्यात आल्यावर पुन्हा 2027 ची मागणी विद्यार्थ्यांनी करू नये. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.