माझ्यावर आलेली जबाबदारी कठीण असली तरी अशक्य नाही, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार भावुक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Untitled Design 113

Untitled Design 113

Sunetra Pawar gets emotional while interacting with workers : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. जबाबदारीची जाणीव व्यक्त करताना त्या म्हणाल्या माझ्यावर आलेली जबाबदारी निश्चितच कठीण आहे, पण ती अशक्य नाही. केवळ पार्थ आणि जयचं नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं माझा परिवार आहे. त्यांच्या वक्तव्यातून पक्षाशी असलेली बांधिलकी आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.

पक्षाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी जपलेले शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी केला. दादांनी ज्या मुल्ल्यांवर पक्ष उभा केला, त्या विचारांच्या आधारेच आपण पक्षाची वाटचाल अधिक बळकट करू, असं त्या यावेळी म्हणाल्या. संघटना मजबूत करणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांचे स्टेटमेंट नोंदवले; तपास सुरूच असल्याची CID ची भूमिका

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पती अजित पवार यांच्याविषयी बोलताना त्या काहीशा भावुक झाल्या. दादांसोबत 40 वर्षांचा संसार केला आहे. त्यांच्या सहवासातून आणि अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं. त्या अनुभवाच्या बळावर आणि तुमच्या साथीने आता ही जबाबदारी पार पाडणार आहे, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, पक्ष आणि समाजासाठी काम करताना कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही.

महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात तळागाळापर्यंत पोहोचून संघटन विस्तारावर भर दिला जाईल आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ केला जाईल, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. नव्या अध्यक्षांच्या रूपाने सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली असली, तरी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक सक्षम आणि संघटित करण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

Exit mobile version