“Super Sunny Month” Sports Festival : युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धा उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या स्पर्धेत तब्बल 17 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला.
पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी अशा चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विविध शहरांमधील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंनीही यात सहभाग घेतला. 21 किमी पुरुष गटात साहिल सागर याने 01.04.34 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. केनियाच्या जॉन म्यूइनडे (01.05.21 सेकंद) याने द्वितीय, तर देइझी इंडल्यू (01.05.27 सेकंद) याने तृतीय क्रमांक मिळवला.
21 किमी महिला गटात साक्षी जड्याल हिने 01.22.29 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. गायत्री पाटील (01.23.12 सेकंद) हिने द्वितीय, तर अश्विनी जाधव (01.23.23 सेकंद) हिने तृतीय क्रमांक मिळवला. १० किमी पुरुष गटात निखिल सहानी याने 31.33 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. ईश्वर जिरवाल (31.55 सेकंद) द्वितीय, तर सौरभ (32.47 सेकंद) तृतीय ठरला.
आयपीएल 2026 – 28 मार्चपासून यंदाच्या हंगामाला सुरुवात; वेळापत्रकाची अजून प्रतीक्षा
10 किमी महिला गटात रविना गायकवाड हिने 35.56 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. साक्षी भंडारी (36.17 सेकंद) द्वितीय, तर मुस्कान कुशवाह (36.31 सेकंद) तृतीय क्रमांकावर राहिली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी निम्हण, सोमेश्वर फाउंडेशनच्या सचिव व माजी नगरसेविका स्वाती निम्हण, तसेच संचालिका मधुरा निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांत्रिक नियोजन प्रमुख यश रायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, “या मॅरेथॉनच्या माध्यमातून पुणेकरांमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि युवकांना सकारात्मक दिशेने प्रेरित करणे हा आमचा उद्देश आहे. ‘रन फॉर अमृतकाल’ या संकल्पनेतून निरोगी आणि सशक्त समाज घडवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.”
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “पुणे शहर नेहमीच क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिले आहे. अशा मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांमुळे नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता वाढते आणि युवा पिढीला प्रेरणा मिळते. ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सव हा पुण्यातील क्रीडा चळवळीला बळ देणारा उपक्रम आहे.”
