मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) ममतादीदी या इंडिया आघाडीतील अतिशय महत्त्वाच्या आणि आमच्या सर्वांच्या प्रिय नेत्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या की, इंडिया आघाडीतील निवडणुकांसाठी सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचे मॉडेल हे वेगळे आहे. त्यामुळे जरी ममतादीदींनी वेगळे लढणार असे जाहीर केले असले तरी त्या इंडिया आघआडीतील वरिष्ठ आणि आमचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम असलेल्या नेत्या आहेत. त्यामुळे लोकसभेत जरी त्यांनी वेगळी लढवण्याची घोषणा केली असली तरी आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचे विजयी उमेदवार हे इंडिया आघाडीसोबतच राहतील असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगालमधील स्थानिक पातळीवरील आव्हाने वेगळी आहे. मात्र, असे असतानादेखील ममतादीदी भाजपाविरोधात प्रचंड ताकदीने लढतील. ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षांपासून त्या संसदेत आमच्यासोबत बसतात त्याच पद्धतीने आम्ही सत्तेत येऊन देशाची सेवा करू असे त्या म्हणाल्या. आम्चायात मतभेद असू शकतात मात्र, मनभेद अजिबात नसल्याचेही यावेळी सुप्रिया यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असून, आघाडीतही काही जागांवर फ्रेंड्ली फाइट्स असू शकतात असे सांगत आमची दडपशाही नाही तर, लोकशाही असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.
वेगळी चूल मांडताना काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
इंडिया आघाडीतील मतभेदांनंतर आपण पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
‘डावे’ ‘इंडिया’त आले अन् ममता बाहेर पडल्या
याआधी रविवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात कोलकाता शहरात एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत त्यांनी काँग्रेसवर टीका करत डाव्या पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. डावे पक्ष आघाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी यावेळी केला होता. ज्या लोकांबरोबर मी 34 वर्षे संघर्ष केला त्यांच्या आघाडीतील प्रवेशाला मी सहमती देऊ शकत नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.