नौदल कर्मचाऱ्यासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू, नेव्ही नगरमधील घटनेने मुंबई हादरली

भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली.

Untitled Design (73)

Untitled Design (73)

Suspicious death of four members of a Navy employee’s family : मुंबईतील कुलाबा परिसरातील नेव्ही नगरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेमुळे नेव्ही नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी नेव्ही नगरमधील निवासी वसाहतीत राहणाऱ्या या कुटुंबातील चौघेही घरात मृतावस्थेत आढळले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूबाबत विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.

मृतांमध्ये नौदलातील कर्मचारी, त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मुलांपैकी एकाचे वय अवघे दोन महिने तर दुसऱ्या मुलाचे वय सुमारे तीन वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी आणि मुलांच्या मृत्यूमागे विषबाधेची शक्यता तपासली जात असल्याची माहिती मिळत असली, तरी अधिकृतपणे कोणतेही निष्कर्ष समोर आलेले नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आशिष बॅनर्जी यांची आत्महत्या; मृतदेहाजवळ सापडली धक्कादायक चिठ्ठी

या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास केला जात आहे. कुटुंबीयांची पार्श्वभूमी, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित बाबी, तसेच घटनास्थळावरील पुरावे यांची सखोल छाननी सुरू आहे. मृत्यूमागे नेमके काय कारण होते आणि घटनेपूर्वी काय घडले होते, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

दरम्यान, भारतीय नौदलानेही या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. नेव्ही नगर, कुलाबा येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलातील एका नौसैनिकासह त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेचा पोलीस तपास सुरू असून, भारतीय नौदलाकडून तपासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे, असे नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतरच या प्रकरणामागील सत्य समोर येणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version