Talk of a change of power in the Beed Municipal Council : बीड नगरपरिषदेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे ठाकल्याची चर्चा आहे. सत्ताधारी गटातील काही नगरसेवक कारभारावर नाराज असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे नगरपरिषदेत सत्तांतराचा शक्यतांना बळ मिळाले आहे. त्यातच अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय भूमिकेत असलेले भाजप नेते योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिल्याने बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
महायुतीच्या पाठिंब्यावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली होती. मात्र सत्तास्थापनेनंतर केवळ सहा महिन्यांतच काही नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारभाराच्या पद्धतीबाबत आणि निर्णय प्रक्रियेबाबत असमाधान असल्याचे बोलले जात असून त्यामुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ आणि स्थैर्य याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, भाजप नेते योगेश क्षीरसारगर यांनी बीडच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शहराच्या विकासासाठी व्यापक सहकार्याची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. त्यांच्या या वक्तव्याकडे केवळ विकासाच्या भूमिकेच्या दृष्टीने नव्हे तर संभाव्य राजकीय बदलांच्या संकेतांच्या रूपाने देखील पाहिले जात आहे.
संजय राऊत 420 आहेत, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये; नितेश राणेंचा जोरदार पलटवार
योगेश क्षीरसागर यांच्या वक्तव्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देत, बीडच्या हितासाठी गरज पडली तर आम्ही दोघेही एकत्र बसण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या प्रतिस्पर्धी मानले जाणारे क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची शक्यता अधिक चर्चेत आली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, क्षीरसागर बंधूंची संभाव्य एकजूट प्रत्यक्षात आली आणि नाराज नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा मिळाला, तर नगरपरिषदेतील सत्तेचे गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांसमोर नवीन आव्हाने निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाची देखील कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे. नाराज नगरसेवकांची समजूत काढणे, सत्ताधारी गटातील एकी कायम ठेवणे आणि बहुमत टिकवून ठेवणे ही मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
सध्या कोणत्याही पक्षाकडून सत्तांतराबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी नगरपरिषदेत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नगरसेवकांची भूमिका, पक्षश्रेष्ठींच्या बैठक आणि स्थानिक राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, बीड नगरपरिषदेतील वाढती नाराजी, क्षीरसागर बंधूंच्या संभाव्य एकजुटीचे संकेत आणि बदलते राजकीय वातावरण यामुळे येणारे काही आठवडे बीडच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
